भंडारा : राष्ट्रवादीचे आमदार राजू कोरमारे यांनी पोलिसांची माफी मागितली तरीही त्यांना अखेर अटक करण्यात आली आहे. यामुळे तुमसर मतदार संघात आणि कार्यकर्त्यांत खळबळ उडाली आहे.
तुमसर तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार राजू कोरमारे यांचे नाव गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यभर चर्चेत आहे. त्यांची पोलीस ठाण्यात झालेली वादावादी आणि त्याचा व्हिडीओ देखील सगळीकडे व्हायरल झाला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री त्यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात चांगलाच राडा घातला होता आणि पोलिसांना शिवीगाळही केली होती. पोलिसांनी त्यांच्या एका व्यापारी मित्राला मारहाण केली आणि त्यांच्याकडील ५० लाख रुपये पोलिसांनी चोरल्याचा आरोप आमदार कोरमारे यांनी लावला होता आणि याच विषयावर जोरदार हमरातुमरी झाली होती. त्यामुळे हा विषय राज्यभर चर्चिला गेला होता.
आमदार राजू कोरमारे यांचे व्यापारी मित्र जात असताना पोलिसांनी त्यांची गाडी थांबवली आणि चालकाला इंडिकेटर का दिले नाही अशी विचारणा केली. यावेळी यासीम छ्वारे , अविनाश पटले आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली पोलिसांनी सोन्याची चैन आणि ५० लाखांची रक्कम पळविल्याची तक्रार छ्वारे आणि पटले यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी देखील या दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली होती. या दरम्यान आमदार राजू कोरमारे यांनी पोलीस ठाण्यात येऊन बराच गोंधळ घातला होता. आमदाराने आधी पोलिसांना शिव्या घातल्या असल्या तरी अखेरीस त्यांनी पोलिसांची माफी मागितली होती परंतु पोलिसांनी आमदार राजू कोरमारे यांना अखेर अटक केलीच. त्यांच्या अटकेनंतर मतदारसंघात प्रचंड खळबळ उडाली असून जिल्ह्यात याच घटनेची चर्चा सुरु झाली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षाचे आमदार असतानाही आणि राज्याचे गृहमंत्री राष्ट्रवादीचेच असताना आमदाराच्या अटकेपर्यंत वेळ गेली याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !