BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ जाने, २०२२

कानशीलात लगावली म्हणून अल्पवयीन मुलांनी केला खून !



पिंपरी : लहान मुलाच्या कानाखाली आवाज काढणे एका तरुणाला भलतेच महागात पडले असून रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने आपल्या कानशिलात मारणाऱ्याचा थेट एका दगडात जीव घेतला. 


लहान मुले आहेत म्हणून मोठी मुलं त्यांच्याशी कसेही वागायचा प्रयत्न करतात पण कित्येकदा हे भलतेच महागात पडते. मोठ्या माणसांचा आदर करावा, मोठ्या माणसांच्या सूचना ऐकाव्या असा काळ आता राहिला नाही. मुले काही चुकीचे करीत असतील आणि त्यांना कुणी मोठ्या माणसाने रोखले तर ही लहान मुले थेट अंगावर धावून येतात आणि  'आम्ही आमच्या बापाचे ऐकत नाही, तू कोण आम्हाला सांगणारा " अशा भाषेत असंस्कारित मुले हल्ली बोलताना दिसत आहेत. पुण्याच्या एका तरुणाला अशा अल्पवयीन मुलाने असा काही इंगा दाखवला की थेट तो आपल्या जिवालाच मुकला आहे. 


अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास परवानगी नाही पण हा कायदा अनेकदा केवळ कागदावर उरलेला दिसतो. दोन अल्पवयीन मुले दुचाकी चालवत निघाले असता जाधववाडी, चिखली येथे राहणारे ३५ वर्षे वयाचे सुनील शिवाजी सगर यांना मुलांच्या दुचाकीचा धक्का लागला. अल्पवयीन असूनही गाडी चालवतात आणि इतरांना धक्का देतात हे पाहून संतापलेले सुनील सगर यांनी दोन मुलांच्यापैकी एकाच्या कानाखाली लावली. १७ आणि १४ वर्षांची ही मुले असल्याने ते घाबरून गप्प बसतील असा सगर यांचा अंदाज असावा पण घडले भलतेच. या मुलांनी सगर यांना मारायला सुरुवात केली. प्रसंग अंगावर येत असल्याचे दिसताच सगर यांनी तेथून पळ काढला पण या मुलांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. त्यांच्यापासून वाचण्यासाठी सगर हे एका दुकानात घुसले. 


दुकानात शिरल्यामुळे ही मुले परत जातील असे सगर यांना वाटले पण तसे घडले नाही. या मुलांनी त्यांना दुकानातून बाहेर काढले आणि बेदम मारहाण केली. ही मारहाण सुरु असतानाच १७ वर्षे वयाच्या मुलाने जवळच पडलेला दगड उचलला आणि सगर यांच्या डोक्यात मारला. एकदा दगड मारून तो थांबला नाही तर तीन वेळा त्याने तो दगड सगर यांच्या डोक्यात घातला. सगर जखमी होऊन खाली पडले. सगर यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले होते आणि लोकही जमा होऊ लागले होते. हे सगळे पाहून मुलांनी गाडी घेऊन तेथून पळ काढला. ही मुले कोण होती, कुठे राहणारी होती याचा कुणालाच काही थांगपत्ता नव्हता. जोरात मार लागल्याने आणि रक्तस्त्राव झाल्याने सागर यांचा या घटनेत मृत्यू झाला आणि पोलिसांनी खुनाचा तपास सुरु केला. 

पोलिसांनी सिसीटीव्ही फुटेज तपासले तसेच त्यांना मुलांनी आणलेल्या गाडीची माहिती उपलब्ध झाली. दुचाकीच्या मालकाचा पोलिसांनी शोध लावला तेंव्हा त्यांच्याकडून दोन मुलांनी गाडी मागून नेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. मुलाच्या दोन मित्रांनी गाडीची मागणी केली होती आणि चिखली येथे मित्राला भेटायला जायचे आहे असे सांगत होते अशी माहिती गाडी मालकांनी पोलिसांना दिली. पोलिसांचा तपास अधिक सोपा झाला होता. गाडीमालकाच्या मुलाला घेवून त्याच्या या दोन दिवट्या मित्राच्या घरी पोलीस गेले आणि खून करून पळून गेलेली दोन्ही मुले घरीच सापडली. 


गाडीमुळे पोलिसांना या खुनाचा छडा लवकर लावता आला.अल्पवयीन मुलांच्या दुचाकीचा धक्का सुनील सागर यांना लागला आणि सगर यांनी केवळ कानशिलात लावली म्हणून अल्पवयीन मुलानी चक्क सगर यांचा दगडाने खून केल्याची घटना घडली. अल्पवयीन मुलांनी केलेले हे कांड पाहून पोलीसही हादरून गेले आहेत. चिखली परिसरात या घटनेचीच चर्चा सुरु आहे.  अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देणे गाडी मालकालाही महागात पडले आहे पण धक्का लागल्याचा राग सुनील सगर यांच्या जीवावर बेतला आहे.         




वाचा > कोरोना रुग्णात पाच पटीने वाढ !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !