BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ जाने, २०२२

कोट्यावधींचा चुना लावणाऱ्या विशाल फटेच्या कार्यालयात चोरी !

 




बार्शी : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात आरोपी असलेला विशाल फटे हाच आता फिर्यादी झाला असून लोकांना चुना लावणाऱ्या फटेच्याच कार्यालयात चोरी झाली आहे. 


बार्शी येथील विशाल फटे हा दुसरा हर्षद मेहता या नावाने ओळखला जाऊ लागला असून कोट्यावधींची फसवणूक केल्याचा त्याच्यावर गंभीर आरोप आहे. काही दिवस बेपत्ता झाल्यानंतर तो स्वतः पोलिसात हजर झाला असून पोलीस त्याने केलेल्या घोटाळ्याची चौकशी करीत आहेत. सद्या तो न्यायालयीन कोठडीत आहे परंतु गरज लागताच पोलीस त्याच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे करणार आहेत. बार्शीतील या प्रकरणाने राज्यभर प्रसिद्धी मिळवलेली आहे. त्यामुळे फटे हा राज्यात माहित झाला आहे. मोठ्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपी म्हणून तो समोर आला असला तरी आता तो एका प्रकरणात फिर्यादी देखील झाला आहे. त्याच्या कार्यालयातील साहित्याची चोरी झाल्याची फिर्याद त्याने बार्शी पोलिसात दिली असून पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. 


बार्शी शहरातील उपळाई रस्त्यावर असलेल्या विशालका कन्सल्टंट प्रा. लि. या कार्यालयातील साहित्य चोरीला गेल्याची फिर्याद विशालने  केली आहे. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवंत सहकारी संस्थेच्या वरच्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात चोरीची  घडली असल्याचे समोर आले आहे.  विशाल फटे याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो या कार्यालयास कुलूप लावून गेला होता. बार्शी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात १३ जानेवारीस फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक केल्यानंतर १७ जानेवारीस बार्शी पोलीस त्याला कार्यालयात तपासासाठी घेऊन गेले असतं पोलिसांनी कार्यालय सील केल्याचे दिसले. त्याने शेअर मार्केट व्यवसायासाठी काही वस्तू खरेदी करून त्या कार्यालयात ठेवलेल्या होत्या. या वस्तू यावेळी दिसून आल्या नाहीत. एक दूरदर्शन संच, एक संगणक, मॉनिटर, एक खुर्ची, युनियन बँकेचे धनादेश पुस्तक, हिशोबाची दैनंदिन नोंदवही असे साहित्य चोरट्याने चोरून नेल्याचे आढळून आले. एकूण ५५ हजार रुपयांची चोरी झाल्याची ही फिर्याद आहे. त्यानुसार पोलिसांची अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 



मोठी माहिती उघड  !

विशाल फटे याच्या आर्थिक घोटाळ्याचा तपास बार्शी पोलीस बारकाईने करीत असून या तपासात मोठी माहिती उघड झाली आहे. शेअर बाजारात पैसे गुंतवून जादा परतावा देण्याचे अमिश फटे दाखवत होता आणि लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करीत होता पण प्रत्यक्षात तो शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करीतच नव्हता अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. एकाकडून रक्कम घेऊन तो दुसऱ्याला देत होता आणि दुसऱ्याची घेऊन तिसऱ्याला देत होता. केवळ एकाकडून दुसऱ्याकडे पैसे फिरविण्याची काम त्याने केले आणि यातच गुंतवणूकदारांचे पैसे वाढले त्यामुळे त्याने बार्शीतून पळ काढला होता. एवढी मोठी रक्कम त्याने नेमकी कुठे आणि कशी घालवली आहे याचा तपास आता बार्शी पोलीस करीत आहेत.     

   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !