पुणे : ( श्रीकांत नागपुरे ) पुण्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक बनू लागली असून तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
राज्यात सर्वच जिल्ह्यात कोरोना वेगाने पसरला असला तरी पुण्यातील तीव्रता वेगळीच असल्याचे आकडेवारीतून समोर येऊ लागले आहे. पुण्यातील कोरोनाचा सकारात्मकता दर अत्यंत चिंताजनक स्थितीत आहे. उच्च जोखीम असलेल्या मुंबई, ठाणे, वर्धा, अकोला, नाशिक या शहराच्या तुलनेत पुणे शहरात सर्वात जास्त म्हणजे ४९.९ टक्के एवढा सकारात्मकता दर आहे. हा दर मागील सप्ताहात नोंदविण्यात आलेल्या राज्याच्या सरासरी दरापेक्षा दुप्पट आहे आणि ही अवस्था भयावह आहे.
शासकीय आकडेवारी पहिली असता १७ जानेवारी ते २४ जानेवारी या दरम्यान घेण्यात आलेल्या आरटी पीसीआर चाचणीत ८४ हजार ९०२ नागरिक कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. रॅपिड अँटीजेन तपासणीत २ लाख २२ हजार नमुने घेण्यात आले होते त्यातील ९७ हजार ८३८ नागरिक बाधित आढळले आहेत. यात साप्ताहिक सकारात्मकता दर मागील सात दिवसांची सरासरी आहे त्यामुळे कोरोना वेगाने पसरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
तज्ञाकडून या दराने पीक पिरियड म्हणून वर्णन करण्यात आले असून पुणे शहरातील कोरोनाचे प्रमाण चिंताजनक स्थितीत पोहोचले असून हे थांबविण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे पुणे महानगर पालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी म्हटलं आहे. पुढील दहा दिवसांपर्यंत अशीच परिस्थिती राहू शकते त्यामुळे या काळात नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. दहा ते पंधरा दिवसांनी रुग्ण कमी होण्यास प्रारंभ होईल अशी अपेक्षा आहे, मुंबईत देखील असाच ट्रेंड दिसून आला होता असेही डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनीही अशीच माहिती दिली असून सकारात्मकता दर अजूनही खूप अधिक आहे. पुढच्या आठवड्यात पुण्यातील केसेस कमी होतील, रुग्णांना कमी प्रमाणात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यामुळे अशा परिस्थितीत रुग्णांच्या संख्येबद्धल घाबरण्याची आवश्यकता नाही फक्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील डॉ. पवार यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !