BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ जाने, २०२२

शिक्षक भरती घोटाळा, बड्या अधिकाऱ्यास अटक !

 




पुणे : शिक्षक भरती घोटाळ्यात आज पुणे सायबर सेल विभागाने आय ए एस दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक केल्याने एकच खळबळ उडाली असून या अधिकाऱ्यास ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. 


गेल्या काही दिवसांपासून शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा राज्यभर गाजत आहे आणि यात रोज नवनवे खुलासे होत असताना आज ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. सद्या राज्याच्या कृषी विभागात उप सचिव या पदावर कार्यरत असलेले सुशील खोडवेकर यांना या घोटाळयाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजार केले आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचा घोटाळा गेल्या काही दिवसांपासून वाजत गाजत आहे पण या प्रकारणात आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक झाल्याने प्रशासकीय यंत्रणेत प्रचंड खळबळ उडालेली आहे. २०१९ ते २०२० या दरम्यान खोडवेकर शिक्षण विभागात कार्यरत होते आणि त्यांनी सावरीकर यांच्याकडून काही रक्कम घेतली असल्याचे तपासात आढळून आले त्यामुळे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत.
 


शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र असलेल्या ७ हजार ८०० परीक्षार्थ्यांकडून पैसे घेऊन पात्र ठरविल्याचे प्रकरण उघडकीस आलेले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९ - २०२० मध्ये ही परीक्षा घेतली होती.  सायबर पोलीस तपास करीत असताना एकेक धक्कादायक माहिती उघडकीस येऊ लागली आहे. त्यात उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचे नाव देखील समोर आले आणि त्यानुसार आज ही कारवाई झाली आहे.  मोठा घोटाळा उघडकीला आल्याने आता २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेत देखील अपात्र उमेदवाराकडून रक्कम घेतून त्यांना पात्र ठरविले असल्याचे समोर येऊ लागल्याने त्या वर्षाची देखील पडताळणी सुरु करण्यात आली आहे. 


या घोटाळयाप्रकरणी याआधीच अश्विनकुमार याला अटक करण्यात आली आहे. कर्नाटक मधील बंगळूरू येथून त्यांना अटक केल्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता घरातून तब्बल २५ किलो चांदी आणि २ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील या आरोपीकडे एवढे मोठे घबाड सापडले असल्याने या घोटाळ्याची व्याप्ती खूपच  मोठी असल्याचे दिसत आहे.  काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यालाही अटक करण्यात आली असून त्याच्याही घरात लाखोंचा मुद्देमाल आढळून आला होता. 


सुपे याच्या घरात २ कोटीपेक्षा अधिक रक्कम आणि लाखोंचे सोन्याचे दागिने आढळून आले होते. त्यानंतर आता  उप सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून त्यांच्या अटकेनंतर आणखी काय काय समोर येतेय हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणारच आहे पण शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा हा अलीकडील अनेक घोटाळ्यातील मोठा घोटाळा असल्याचे संकेत मात्र मिळू लागले आहेत.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !