सोलापूर : सोलापूर पोलिसांनी एक आंतरराज्य टोळी पकडली असून ११ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. केवळ मोबाईल चोरी करण्यासाठी ही टोळी नागपूर ते सोलापूर प्रवास करीत होती.
चोरीच्या घटना वाढलेल्या असून रोज कुठे न कुठे चोऱ्या होत असतात. पोलीस आरोपींना गजाआड करतात पण चोरीच्या घटना काही थांबत नाहीत. स्थानिक चोराबरोबर पर राज्यातील चोर देखील येऊन चोरी करीत असल्याचा एक प्रकार उजेडात आला असून सोलापूर पोलिसांनी हे मोठे यश मिळवले आहे आणि या चोरांकडून लाखोंचा माल देखील जप्त केला आहे. सोलापूर पोलिसांनी एक दोन चोर नव्हे तर संपूर्ण टोळीलाच आज गजाआड केले आहे.सदर टोळी ही नागपूर येथून सोलापूरला येऊन चोरी करायची अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मोबाईल चोरण्याच्या उद्देशानेच ही टोळी एवढ्या लांबून येत असून ही टोळी मुळची झारखंड राज्यातील आहे.
या टोळीतील एकूण अकरा जण पोलिसांच्या हाती लागले असून त्यांच्याकडून ६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीला अटक केली असून त्यांच्याकडून आणखी काही चोरींचा तपास पोलीस लावत आहेत. विशेष म्हणजे या टोळीत दोन अल्पवयीन आरोपी देखील सहभागी असल्याने समोर आले आहे. या चोरट्यांनी चोरलेला मोटार सायकल, मालवाहू ट्रक, मोबाईल, सोन्याचे दागिने असा ऐवज देखील जप्त केला आहे. नागपूर येथून हे चोर सोलापूरपर्यंत केवळ मोबाईल चोरीसाठी येत होते आणि येथे आल्यावर ते लहान मुलांच्या मदतीने मोबाईलची चोरी करीत होते. पण सोलापूर येथील जोडभावी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी यातील अकरा जणांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून अनेक चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
सोलापूर शहरात आजवर अनेक मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. लक्ष ठेवून लोकांचे मोबाईल चोरले जात होते. यातील अनेक प्रकाराने पोलीस ठाण्यापर्यंत जात नव्हती तर काही प्रकाराने पोलिसात पोहोचत होती. सोलापुरात अथवा अन्यत्र या टोळीने कुठे आणि कशाची चोरी केली हे देखील आता सोलापूर पोलिसांच्या तपासात उघड होण्याची शक्यता आहे. या तपासात राज्यातील अन्य ठिकाणी केलेल्या चोऱ्या देखील उजेडात येणार असल्याची शक्यता असून सोलापूर पोलिसांची ही मोठी कामगिरी मानली जात आहे. मोटार सायकलसह मालवाहू ट्रक देखील या टोळीने चोरला असल्याने मोबाईलपासून सोन्याच्या दागिने आणि मालट्रक इथपर्यंत सगळ्या प्रकरच्या चोऱ्या करण्यात ही टोळी पारंगत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून अनेक चोरीच्या घटनावर प्रकाश पडू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !