पुणे : 'माझ्या लेकरांची काळजी घ्या' असं या जगाचा निरोप घेण्याआधी अनाथांची माय म्हणाल्या होत्या. अखेरच्या भेटीत जेष्ठ शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांच्याजवळ बोलताना सिंधुताई सपकाळ यांना शेवटचा क्षण जवळ आल्याची जाणीव झाली होती असेच दिसते.
अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी काल पुण्याच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि हजारो लेकरांसह महाराष्ट्र पोरका झाला. आयुष्यभर अडचणींचा सामना करीत या माईने हजारो हजारो अनाथ लेकरांना पदरात घेतले आणि त्यांचे जीवन फुलवले. ही अनाथ मुलं म्हणजेच त्यांचे जगणे होते, आयुष्यात अनेक संकटांचा आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत या माईने अनाथाना आपलंसं करून त्यांना आईची माया आणि वडिलांचे छाया सिंधुताई सपकाळ यांनी दिली. अनाथ लेकरं हाच त्यांचा श्वास होता आणि अखेरच्या काळात देखील त्यांना आपल्या या लेकरांचीच चिंता होती. कदाचित त्यांना आपल्या अखेरच्या क्षणाची चाहूल लागली असावी म्हणूनच त्या 'माझ्या लेकरांची काळजी घ्या' असे म्हणाल्या असाव्यात.
पद्मश्री सिंधुताई गेल्याची माहिती जेष्ठ शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी माध्यमांना दिली यावेळी पत्रकारांनी 'अखेरच्या भेटीत माई काय म्हणाल्या होत्या ?' असा प्रश्न त्यांना विचारला. यावेळी सुरेशकुमार वैराळकर यांनी ही माहिती दिली. शाहीर वैराळकरयांनी दोन दिवसापूर्वी माईशी आपलं बोलणं झालं होतं असं सांगितलं. माईनी ज्या हजारो मुलाचं पालकत्व स्वीकारलं होतं त्यांची चौकशी आणि विचारपूस करीत त्यांची काळजी घेण्याची सूचना माईनी केली होती अशी माहिती वैराळकरयांनी दिली.
या भेटीत माई मुलांचीच चौकशी करीत होत्या. माझ्या मुलाचं कसं आहे ? त्याचं सगळं काही व्यवस्थित आहे ना ? मुलांची व्यवस्थित सोय ठेवा' असेही माई म्हणाल्या होत्या अशी माहितीवैराळकर यांनी दिली. अनाथांच्या या माईने आपली संपूर्ण हयात या लेकरांसाठी घालवली आणि अखेरच्या काळातही आपल्या प्रकृतीपेक्षा त्यांना या लेकारांचीच काळजी लागून रहिली होती. आयुष्यभर फुलासारखं जपलेल्या या लेकरांना सोडून मात्र ही माय निघून गेली आणि लेकरं पुन्हा अनाथ झाली.
रात्री ८ वाजून १० मिनिटांनी सिंधुताई यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधुताई सपकाळ यांचे पार्थिव आज मांजरी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर ठोसर पागेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिंधुताई या महानुभाव पंथाच्या अनुयायी असल्यामुळे त्यांच्या पार्थिवावर दफनविधी होणार आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ओम शांती ! - पंतप्रधान
सिंधुताई यांच्या जाण्याबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. सिंधुताई यांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला आहे, डॉ. सिंधुताई सपकाळ या त्यांनी केलेल्या समाजसेवेसाठी स्मरणात राहतील, त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक मुले चांगले जीवन जगू शकली. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती संवेदना व्यक्त करतो, ओम शांती ! अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
वात्सल्यसिंधू - लता मंगेशकर
वात्सल्यसिंधू, अनाथांच्या आई, थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच अत्यंत दु:ख झाले, त्यांच्या निधनाने समाजाची अपरिमित हानी झाली आहे. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन आम्ही त्यांचा गौरव केला होता. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदास्न करो' अशी श्रद्धांजली जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी अर्पण केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !