पुणे : अनाथांची माय झालेल्या आणि अनाथ लेकरांसाठी चंदन होऊन झिजलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी रात्री निधन झाले आणि सगळ्यांना अनाथ करून सिंधुताई यांनी जगाचा निरोप घेतला .
आयुष्य कष्टात आणि केवळ सेवाभाव जपत अनाथांसाठी चंदनासारखं झिजलेल्या आणि येईल त्या प्रसंगाला हिमतीने सामोरे गेलेल्या सिंधुताई महाराष्ट्राच्या माई होत्या. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महिन्यापूर्वीच त्यांच्यावर हर्नियाची शाश्त्राक्रिया झाली होती. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी पुण्याच्या खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा अनाथ झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आणि एक क्षण सगळ्यांचाच श्वास थांबला.
स्वतःचं आयुष्य अंत्यत खडतरपणे जगत त्यांनी हजारो हजारो अनाथ मुलांना पदरात घेतले आणि त्यांना आईच्या मायेने सांभाळले. त्यांच्या सेवाभावाची दखल घेऊन त्यांना अलीकडेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चौथी इयत्तेपर्यंत त्यांना शिक्षण घेता आले होते आणि वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न झाले होते. तेथून त्यांच्या आयुष्याचा संघर्ष सुरु झाला होता. या संघर्षातूनच त्या समाजाची सेवा करण्याच्या मार्गाकडे वळल्या. अनाथ मुलं हेच त्यांचा विश्व होतं. अनाथांच्या जगण्याचा आधार असलेल्या माई आणि त्यांचे अथांग कार्य सातासमुद्राच्या पलीकडे गेलेले होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राला धक्का बसला आहे. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
श्रद्धांजली !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !