BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जाने, २०२२

दुकानांच्या पाट्या आता मराठीतच, अन्य भाषांनाही मुभा पण -

 



मुंबई : अखेर राज्य शासनाने मराठीबाबत मोठा निर्णय घेतला असून राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापना यांचे नामफलक मराठी भाषेत असणे बंधनकारक करण्यात आले आहे.


महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राच्या सर्व सोयी सुविधा उपभोगून अनेकांना मराठी बोलता येत नाही आणि महाराष्ट्रातल्या शहरात असलेल्या दुकानांच्या पाट्या इंग्रजी अथवा अन्य भाषेत असतात, ग्राहक मराठी पण दुकाने आणि कार्यालयांचे फलक मराठीशिवाय अन्य भाषेत असतात. यावर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे पण आजवर हा विषय चर्चेत आणि मराठी भाषा दिनाच्या दिवशीच समोर येत असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र सतत या विषयाचा पाठपुरावा केला आहे आणि आता राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय ठरला आहे. मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी १४ जानेवारी ते २८ जानेवारी या दरम्यान 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा करण्यात येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 


महाराष्ट्रातील सर्वच दुकानांचे नामफलक तसेच आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेतच असायला हवेत. इतर भाषेचा वापर करता येईल पण अन्य भाषेतील अक्षरांचा आकार मराठी भाषेतील अक्षरांच्या पेक्षा मोठा असणार नाही असे फलक आता सर्व व्यापाऱ्यांना लावले लागणार आहेत.  जेथे दहा पेक्षा कमी संख्येने कामगार आहेत अथवा अधिक असलेल्या सर्व आस्थापना अथवा दुकानांसाठी मराठी भाषेत नामफलक लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. नामफलक मराठीसह अन्य भाषेत लिहिता येणार आहे पण सुरुवातीला मोठ्या अक्षरात मराठी भाषेत लिहिणे आवश्यक आहे आणि अन्य भाषेतील अक्षरांपेक्षा मराठी भाषेतील अक्षरे लहान करता येणार नाहीत. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या कोणत्याही शहरात गेला तर दुकाने आणि आस्थापनांच्या मराठी पाट्याच यापुढे पाहायला मिळणार आहेत आणि मराठीचा पुन्हा एकदा गौरव होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे राज्यात जोरदार स्वागत झाले आहे. 


मद्य विक्री केली जाते अशा अनेक दुकानांनाना राष्ट्रपुरुष अथवा गड किल्ले आणि महिलांची नवे दिलेली असतात. अशी नवे देवून आत मात्र मद्यविक्री किंवा मद्यपान सेवा दिलेली असते. हा प्रकार म्हणजे एकप्रकारे महापुरुषांचा आणि गड किल्ल्यांचा अवमानच असतो. या फलकावर महापुरुषांचे छायाचित्र देखील पाहायला मिळत असते पण यापुढे हे घाणेरडे प्रकार बंद होणार आहेत. शासनाने याबाबत देखील महत्वाचा निर्णय घेतला आहे. मद्य विक्री, मद्यपान सेवा दिली जात असेल अशा दुकानांना बार अथवा रेस्टोरंट याना महापुरुष किंवा आदरणीय महिलांची, गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन ) अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. 


कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात स्थानिक भाषेत दुकानांच्या पाट्या लावणे बंधनकारक आहे आणि तेथे कन्नड आणि तमिळ भाषेला डावलण्याची कुणी हिम्मत देखील करीत नाही. महाराष्ट्रात मात्र सर्रास मराठीला डावलण्यात येते. विशेषतः मुंबई, ठाणे, नागपूर अशा मोठ्या शहरात मराठी पाट्या दुर्मिळ असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा विषय आक्रमकपणे हाताळला होता आणि मराठीला डावललेल्या अनेक नामफलकांना काळे फासण्यात आले होते. मनसे आक्रमक झाल्यानंतर काही ठिकाणी मराठी नामफलक दिसून आले पण पुन्हा हळूहळू मराठी भाषेला डावलून अन्य भाषेतील फलक दुकानावर दिसू लागले होते. आता मात्र कायद्यानेच मराठी विरोधकांना लगाम लावण्यात आला असून महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी नामफलक लावलेच लागणार आहे. 


मराठी नामफलकांची सक्ती दहा पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांना आणि आस्थापनांना लागू होत नसल्याने या पळवाटेचा आधार घेऊन मराठी नामफलक लावत नव्हते आणि नियमातील त्रुटीमुळे कारवाई देखील करण्यात कायदेशीर  अडचण येत होत पण आता सरसकट दुकाने आणि आस्थापना यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे कुठलीही पळवाट शिल्लक उरली नाही.  


मराठी वापराचा 

आदेश इंग्रजीत 


इंग्रजी भाषेचा पगडा काही केल्या जात नाही याचा अफलातून प्रकार समोर आला आहे. एकीकडे शासकीय कामकाज मराठीतून व्हावे असा दंडक असूनही शासकीय कार्यालयातील अनेक आदेश आणि पत्रव्यवहार हे इंग्रजी भाषेत होताना दिसतात. न्यायालयात देखील सर्रास इंगजीचाच वापर केला जातो. 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा केला जात असताना अनेक विभागांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा अशा सूचना देणारे आदेश निर्गमित केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने देखील राज्यातील न्यायालयानं अशीच सूचना दिली आहे पण याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत. मराठीचा वापर करण्याच्या सूचना देणारा आदेशच इंग्रजी भाषेत देण्यात आला आहे, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मराठीचा वापर करण्यासाठीचे पत्रच जर इंग्रजी भाषेत दिले असेल तर प्रत्यक्षात मराठी भाषेचा कितपत वापर केला जाईल याबाबत शंकाच निर्माण होत आहे. 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा करायचा आहे पण याची सुरुवातच इंग्रजी भाषेतून झाली असेल तर पुढे काय ? हा प्रश्न कुणालाही पडणार आहे ! 


वाचा : क्लिक करा :> प्रणिताताई भालके गरजल्या, म्हणाल्या, ----








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !