BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० जाने, २०२२

शिवसेना आमदारानेच काढली शिवसेनेची लक्तरे !

 


पंढरपूर : शिवसेनेच्या तिकिटावर सांगोला मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेचीच लक्तरे वेशीवर टांगली असून आता राज्यात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.


सांगोला तालुक्यातील नेते आणि शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांची वक्तव्ये नेहमीच गाजतात आणि वाजतातही ! साखर कारखान्याच्या निवडणुका कशा पैशावर आणि मटणावर जिंकल्याचा खुमासदार प्रसंग त्यांनी नुकताच सांगितला होता आणि पडद्याआड काय काय घडले होते याचाही पंचनामा त्यांनी मांडला होता. आता मात्र त्यांनी शिवसेनेवर केवळ टीकाच केली नाही तर सेनेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. शिवसेनेकडे बोट दाखवत असतानाच त्यांनी भाजपला गोंजाराण्याचे देखील काम केले आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत शहाजीबापू नक्की कुठे असतील याची चर्चा आत्तापासूनच सुरु आहे. शिवसेनेचे आमदार असतानाही त्यांनी थेट शिवसेनेला अंगावर घेतले आहे आणि अत्यंत कमी लेखत सेनेला डिवचले आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील राजकारण बदलाच्या वावटळीत दिशा बदल करेल अशी शंकाही आता व्यक्त होऊ लागली आहे. भाजपच्या खासदाराला मंत्री करा अशी मागणी शिवसेना आमदार करताहेत हे आश्चर्यजनक असून खा. निंबाळकर यांना केंद्रात मंत्री करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आणि त्यासाठी मोदी शहा यांना भेटणार असल्याचे सुतोवाच देखील करण्यात आले. जवळपास ३० वर्षे बापूनी कॉंग्रेस पक्षात काढले यावेळी कॉंग्रेस पक्षाने त्यांना काय दिले हे जनतेच्या तरी माहितीत नाही. एखादे महामंडळ तरी बापुना द्यायला हवे होते.   


पंढरपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना आ. शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेला अत्यंत कमी लेखत भाजपचा उदो उदो केला आहे. देश आणि राज्य पातळीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष वरचेवर वाढत असताना शिवसेनेच्या आमदाराने भाजपचे जाहीर गोडवे गायले आहेत हे सेनेला रुचणारे नक्कीच नाही ' सांगोला तालुक्यात शिवसेनेला फक्त ११०० मते मिळाली' हे सांगून त्यांनी शिवसेनेची काहीच शक्ती नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. सांगोला विधानसभा मतदार संघात पंढरपूर तालुक्याचा काही भाग येतो आणि हा भाग शिवसेनेचे प्राबल्य असल्याचे पूर्वी समजले जात होते. त्यामुळे सांगोला आणि पंढरपूर तालुक्यात सेनेचे हवे तेवढे आस्तित्व उरले नसल्याचेच आमदार  पाटील यांनी दाखवून दिले आहे. 


आपण भाजपच्या पाठींब्यावर निवडून आलो आणि आमदार झालो असे सांगून त्यांनी शिवसेनेला थेट बाजूला काढले आहे. भाजपचे आपल्यावर लक्ष होते आणि कुठे काही कमी पडत्येय काय ? अशी विचारणा करणारे फोन भाजपकडून येत होते' असे सांगत असतानाच त्यांच्या मनातील खदखद बाहेर आली. माढा लोकसभा मतदार संघातून आपला एक मंत्री नाही आमचा कुणी विचार कार्याला तयार नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कुणी आमचं ऐकेल असं वाटत नाही आणि आमचा कुणी विचार करील असेही वाटत नाही . आम्हाला साधं विचारलंही जात नाही, घर की  मुर्गी दाल बराबर असं झालंय असेही आ. पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितले आहे. 


आ. शहाजीबापू पाटील यांची सगळी खदखद शिवसेनेच्या विरोधात होती. शिवसेनेत एवढे उघडपणे आणि आव्हानात्मक बोलण्याची हिम्मत कुठले आमदार करीत नव्हते पण आता राज्याचे सत्तेत शिवसेना असून आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असताना शिवसेनेचेच आमदार सेनेचा 'कचरा' करू लागलेत याचा अन्वयार्थ नक्कीच वेगळा निघणार आहे. सांगोला मतदार संघात शिवसेनेची केवळ ११०० मते असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आणि शिवसेनेची किती शक्ती आहे यावरच बोट ठेवले. पंढरपूर, सांगोला येथील शिवसेना केवळ नावालाच उरली असल्याचेच त्यांनी अप्रत्यक्ष सांगून भाजपचे गोडवे गायले आहेत. एवढेच नव्हे तर आपण भारतीय जनता पक्षामुळे आमदार झालो आहोत असेही त्यांनी सांगितले आहे. आता शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी काही तोंड उघडणार की नेहमीप्रमाणे 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' चा पवित्र घेणार हे लवकरच दिसणार आहे. 


शिवसेनेचाच आमदार आपण भाजपमुळे आमदार झाल्याचे सांगत असेल तर शिवसेनेला राज्य पातळीवरून याची गंभीर दाखल घ्यावीच लागेल. शिवसेना आणि भाजप एकमेकांना पाण्यात पहात असताना सेनेच्या आमदाराने जाहीरपणे भाजपचे कौतुक केलेले सेनेला रुचणार नाही पण वरिष्ठ पातळीवरून यावर काय प्रतिक्रिया उमटतात हे देखील पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना आमदारांचा तर विषयच नाही पण मंत्री, मुख्यमंत्रीही ब्र काढण्याची हिम्मत करीत नव्हते. आता मात्र शिवसेनेचेच आमदार भाजपचे जाहीरपणे गोडवे गाताना दिसू लागले आहेत. हे असेच चालत राहिले तर शिवसेनेतील पूर्वीचा दमखम नक्कीच कमी होईल आणि काळ सोकावला जाईल या भीतीने शिवसेना काय भूमिका घेईल हे येत्या काळात स्पष्ट होईल. आ शहाजीबापूनी मात्र शिवसेंनेची लक्तरे वेशीवर टांगली हे मात्र नक्की !     

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !