BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ जाने, २०२२

साडे पाच लाखांची लाच घेताना उप जिल्हाधिकारी जाळ्यात !

 




कोल्हापूर : महसूल विभागातील आणखी एक मोठा मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून राधानगरीचे प्रांताधिकारी आणि एक सरपंच यांना साडे पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. 


अलीकडच्या काळात महसूल आणि पोलीस विभागातील अनेक जण लाच प्रकरणी तुरुंगात गेले असून मोठे मासेच अधिक प्रमाणात एसीबीच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. खाडी क्रशर व्यावसायिकावर कारवाई न करण्यासाठी राधानगरी येथील प्रांताधिकारी प्रसेनजित प्रधान आणि फराळे ग्रामापाचायातीचे सरपंच संदीप जयवंत डवर यांना साडे पाच लाख रुपयांची लाच घेताना एसीबी च्या पथकाने रंगेहात पकडले. या घटनेमुळे केवळ महसूल विभागातच नाही तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सेंट्रल बिल्डींग कार्यालयातच आज ही कारवाई करण्यात आली आहे. प्रांताधिकारी आणि सरपंच यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या प्रकरणी तक्रारदार हे उद्योजक असून फराळे गावाच्या हद्दीत त्यांचा खडी क्रशरचा व्यवसाय आहे. क्रशरवरील जड वाहनांच्या वाहतुकीमुळे परिसरातील रस्ते खराब झाले असून काही घरांच्या भिंतीला तडे गेलेले आहेत त्यामुळे सरपंच डवर यांनी क्रशर मालकाला ग्रामपंचायतीची एक नोटीस दिली होती आणि क्रशर बंद का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली होती. ग्रामपंचायतीच्या नोटिसीचा आधार घेत प्रांताधिकारी यांनीही क्रशर मालकाला नोटीस दिली होती. त्यामुळे क्रशर मालकाने कारवाई होऊ नये यासाठी सरपंच आणि प्रांत अधिकारी यांची भेट घेतली होती. सरपंचाने मात्र कारवाई टाळायची असेल तर प्रांत प्रधान यांना दहा लाख आणि स्वत:साठी दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते. व्यावसायिकाने आज सकाळी प्रांताधिकारी यांना घरी जाऊन भेटून, सरपंच यांनी आपल्यासाठी दहा लाख रुपये मागितले असल्याचे सांगितले. यावर त्यांनी संमती दर्शवली आणि ही रक्कम सरपंच यांच्याकडे देण्यास सांगितली. 


आज दुपारी सरपंच प्रांताधिकारी यांच्या कार्यालयाजवळ आले असता क्रशर मालकाकडून प्रांताधिकारी यांच्यासाठी पाच लाख आणि स्वत:साठी पन्नास हजार रुपये स्वीकारतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले आणि लगेच प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन प्रांताधिकारी प्रधान यालाही ताब्यात घेतले. रविवारची सुट्टी असतानाही प्रांत कार्यालयात उपस्थित राहिले होते. मोठ्या पदावरील अधिकारी पकडला गेल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !