BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ जाने, २०२२

सावधान, मोड आलेला बटाटा ठरू शकतो जीवघेणा !

 




मुंबई : बटाट्याची भाजी जवळपास सगळ्यांनाच आवडते पण हा बटाटा जर मोड आलेला असेल तर असा बटाटा विषारी असतो हे अनेकांना माहित नसते त्यामुळे मोठा धोका होऊ शकतो. 


बटाटा ही प्रत्येक घरात आढळणारी आणि आवडीने खाल्ली जाणारी भाजी आहे. या भाजीचे आस्तित्व स्वतंत्र असले तरी विविध भाज्यात आणि पदार्थात बटाटा हमखास वापरला जातो. शिवाय बटाटा वडा, बटाटा भजी, चिप्स, फिंगर चिप्स अशा विविध प्रकाराने बटाटा आवडीने आणि चवीने खाल्ला जातो. बटाटा न आवडणारी व्यक्ती विरळाच सापडू शकते. कुठल्याही बाजारात गेले की कुठली भाजी मिळेल न मिळेल पण बटाटा हमखास आणि बाराही महिने उपलब्ध असणारी भाजी आहे. पण हा बटाटा काही दिवस राहिला की त्याला मोड यायला सुरुवात होते, या बटाट्यातून कोंब बाहेर यायला सुरुवात होते. भाजी मार्केटमध्ये विक्रीस असलेल्या बटाट्यात काही प्रसंगी असे मोड आलेले बटाटे पाहायला मिळतात किंवा घरात अधिक दिवस बटाटे ठेवले तरी त्यांना मोड यायला सुरुवात झाल्याचे दिसून येत असते. 


मुग, मटकी, हरभरे यांना मोड आणून भाजी केली जाते शिवाय मोड आलेली कडधान्ये आवर्जून खावीत असा सल्ला डॉक्टर देत असतात पण मोड आलेले बटाटे हे विषारी असतात याची अनेकांना कल्पनाही नसते. अनेक घरात कित्येकदा असे बटाटे खाण्याचे धाडस केले जात असते. हे शरीराला अत्यंत अपायकारक असून असे बटाटे फेकून देणेच उत्तम असते. असे बटाटे खाल्ले तर शरीरावर किती घातक परिणाम होतात याची माहितीही अनेकांना नसते. मोड आलेले बटाटे विषारी असतात त्यामुळे ते फेकून देणे हाच एकमेव मार्ग असतो. नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटरने याबाबत स्पष्ट केले असून असे बटाटे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या अहवालानुसार बटाट्यात सोलोनाईन आणि चाकोनाइन असे विषारी घटक नैसर्गिकरित्याच असतात. हे विषारी घटक फारच कमी प्रमाणात असतात पण बटाट्याच्या वनस्पतीत आणि पानामध्ये हे विषारी घटक अधिक प्रमाणात असतात. 


बटाट्याला मोड येऊ लागले अथवा ते अंकुरित होऊ लागले की सोलोनाईन आणि चाकोनाइन या विषारी घटकांचे प्रमाण वाढायला लागते त्यामुळे असा बटाटा कोणत्याही प्रकाराने खाल्ला तर ते घटक शरीरात जातात आणि आपल्या आरोग्याला नुकसानदायक ठरतात. अर्थात असा बटाटा एकदा दोनदा खाल्ल्याने फार काही नुकसान होत नाही पण जर अशा बटाट्यापासून बनवलेले अन्न सतत खाण्यात आल्यास मात्र अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पोटाशी संबंधित असलेल्या अनेक समस्या यातून उद्भवतात.  त्यामुळे अशा बटाट्यापासून दूर राहिलेले केंव्हाही चांगले ठरते. 


उपलब्ध अहवालानुसार अशा बटाट्यातील विषारी घटक जर अधिक प्रमाणात शरीरात जाऊ लागले तर अनेक लक्षणे दिसायला लागतात. पोटदुखी, उलट्या, जुलाब अशा प्रकारे त्रास जाणवू लागतो. काही व्यक्तींच्या मध्ये हे सौम्य तर काहींच्यात गंभीर स्वरूपात हा त्रास होऊ शकतो. यामुळे जर परिस्थिती अधिक गंभीर झाली तर ताप, डोकेदुखी आणि कमी रक्तदाब यालाही सामोरे जावे लागते आणि यावर वेळीच नियंत्रण आणता आले नाही तर मृत्यू देखील ओढवू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे बटाटे कुठल्याही स्वरूपात शरीरात न जाऊ देणे हेच आरोग्यासाठी उत्तम आणि हिताचे ठरते. 



   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !