कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी 'मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो' असे विधान केल्याने राज्यात भाजपने रान पेटवले आहे. राज्यभर आंदोलन झाले पण नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आपले हे विधान नव्हते तर गावगुंड मोदीबाबत आपण बोललो असल्याचे पुन्हा पुन्हा सांगितले. पोलीसही या कथित मोदीच्या शोधात होते पण पोलिसांना हा गावगुंड मोदी काही केल्या सापडत नव्हता. अखेर हा मोदी टोपणनाव असलेला उमेश घेरडे समोर आला आणि नाना पटोले यांच्यावर टीका करणारे तोंडघशी पडले आहेत. नाना पटोले यांनी ज्या मोदीबाबत वक्तव्य केले आहे तो आपणच असून आपले मोदी हे टोपणनाव आहे असा दावा या उमेश घेरडे याने केला आहे.
आपण दारूच्या नशेत असताना कोणालाही काहीही बोलून जातो, दारू पिऊन नाना पटोले यांना आपण शिवीगाळ केली होती, त्यांची माफी मागयालाही आपण जाणार होतो पण मला त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मी गावी निघून गेलो. तेथेही लोक मला धमक्या देत होते म्हणून मी पुन्हा नागपूरला आलो आणि वकील सतीश उके यांची भेट घेतली असेही या गावगुंड मोदी उर्फ उमेश घेरडे यांनी सांगितले आहे.
आपले टोपण नाव मोदी असे आहे, म्हणजे माझी बायको मला सोडून गेल्यापासून लोक मला मोदी म्हणतात. गावातील लहान मुले, मोठी मनसे असे सगळेच मोदी याच नावाने हाक मारतात. माझ्या मूळ नावाने मला कुणीच हाक मारीत नाही. मी दारूचा व्यवसाय करतो, नाना पटोले मला बोलतात तर मी देखील त्यांना बोलू शकतो, मी गावात भांडण करतो, मारामारी करतो त्यामुळे मला गावातील लोक देखील घाबरतात अशी माहितीही त्याने पत्रकार परिषदेत दिली.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ते विधान केल्यानंतर भारतीय जनता पक्ष प्रचंड आक्रमक झाला होता. देशाच्या पंतप्रधानांच्या बाबतीत असे विधान खपवून घेतले जाणार नाही असे भाजप नेते म्हणत होते, पटोले यांची जीभ छाटण्याची भाषा करीत बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. राज्यातील भाजपचे जवळपास सगळेच नेते नाना पटोले यांच्यावर अक्षरश: तुटून पडले होते. मोदी नावाचा गावगुंड आस्तित्वातच नाही असे भाजप नेत्यांचे म्हणणे होते पण आता हा गावागुंड मोदी माध्यमांसमोर हजर झाला आणि सगळ्यांचीच बोलती बंद झाली आहे. . .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !