BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ जाने, २०२२

मायलेकींचा मृत्यू बुडून नव्हे तर हुंडाबळी !


 

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील आईसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू हा अपघात नसून हुंडाबळी असल्याची तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. 


पाथरी येथील शेततळ्यात आई आणि दोन कोवळ्या मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरून गेला होता.  उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथील शेतात अक्षय ढेकळे यांचे घर आहे, २१ जानेवारी रोजी दुपारी २२ वर्षे वयाची त्यांची पत्नी सारिका अक्षय ढेकळे आपल्या चार वर्षे वयाची मुलगी गौरी आणि दोन वर्षांची मुलगी आरोही हे मिळून शेतात गेले होते.  त्यानंतर तिघेही शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. सदर घटना उघडकीस आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली होती आणि जिल्हा हादरून गेला होता. 


या करूण घटनेनंतर मात्र घटनेबाबत शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. हा अपघात आहे की आत्महत्या ? असा प्रश्न उपस्थित होत होता आणि पोलिसांनी देखील त्या दिशेनेच तपासाला सुरुवात केली होती. या घटनेनंतर मात्र सदर प्रकरणाला अपेक्षेप्रमाणे वेगळे वळण लागले असून मयत सारिका ढेकळे यांच्या आई लक्ष्मी सुरवसे (नांदगाव, तुळजापूर ) यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दहा जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हा अपघात नसून हुंडाबळी असल्याचे मृत सारिका ढेकळे यांच्या आईची तक्रार असून त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. 


मयत सारिका हिचा २०१७ साली आकाश उर्फ अक्षय ढेकळे याच्यासोबत विवाह झाला होता. विवाह झाल्यापासून सासरचे लोक सारिकाला त्रास देत होते. मानपान म्हणून लग्नाच्या वेळी चांगला आहेर दिला नाही, सोने दिले नाही म्हणून सासरच्या लोकांकडून तिचा छळ केला जात होता. घालून पाडून बोलणे, टोचून बोलत अपमानित करणे , नवे कपडे न देणे, घरात उपाशी ठेवणे, माहेरू येऊ न देणे, फोनवर बोलू न देणे असा त्रास दिला जात होता. दोन मुले झाल्या म्हणूनही तिचा छळ केला जात होता. वारंवार होणाऱ्या त्रासाला वैतागून सारिका यांनी आपल्या दोन मुलीसह शेततळ्यात आपला जीव दिला आहे. तिच्या मृत्यूस सासरचे लोक कारणीभूत आहेत अशा प्रकराची फिर्याद सारिकाच्या आईने दिल्याने या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. 


पोलिसांनी या फिर्यादीनुसार सारिका आणि तिच्या दोन मुलींच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तसेच हुंडाबळी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. दहा जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पती अक्षय ढेकळे, सासरा उत्तम ढेकळे, दीर आण्णासाहेब ढेकळे यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  आकाश ढेकळे, उत्तम ढेकळे, अनिता उत्तम ढेकळे, आण्णासाहेब उत्तम ढेकळे, पूजा आण्णासाहेब ढेकळे, विलास सुरवसे, सोजाराबाई विलास सुरवसे, साळूबाई बाळा गुंड यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


शेततळ्यात बुडून तिघींचा मृत्यू झाला हे प्रथमदर्शनी कुणालाही पटत नव्हते. अक्षय ढेकळे याचे शेतातच घर आहे आणि द्राक्षबागेतील पाखरे हाकण्यासाठी मयत सारिका शेतात गेली होती असे सुरुवातीला सांगण्यात आले. पाखरे हाकण्यासाठी गेलेली सारिका शेततळ्यात आपल्या एवढ्या लहान दोन मुलीना घेऊन शेततळ्यात जाण्याचा प्रश्नच येत नव्हता. पाणी पिण्यासाठी घर असताना शेतातील या तळ्यात चिमुकल्या मुलांना घेऊन जाण्याचे काहीच कारण दिसत नव्हते. एकूण परिस्थिती पाहता हे मृत्यू बुडून झाले नसावेत असेच वाटत होते. एक तर ही आत्महत्या असावी किंवा घातपात असावा अशी शंका अनेकांना होती. अखेर सारिकाच्या आईने याबाबत तक्रार दिली आणि दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोन नाजूक मुली आणि तरुण आई हिच्या अशा मृत्यूमुळे मात्र सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.     



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !