BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ फेब्रु, २०२२

डोस घेतल्याने मुलाचा मृत्यू, पोलीसात तक्रार !

 



पालघर : एम आर आणि ट्रिपल बुस्टर डोस दिल्याने १६ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करून कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 


कोरोनाला अटकाव करणाऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लस वरदान ठरली असल्याचे दिसत असताना या लसीबाबत देखील अशा प्रकारच्या तक्रारी पुढे आल्या आहेत परंतु आता एम. आर. आणि ट्रिपल बुस्टर डोसमुळे १६ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला आहे. पालघर जिल्ह्यातील कोशिमशेत या गावातील ही घटना आहे आणि या आरोपावर आता पोलीस आणि आरोग्य विभाग यांच्याकडून लगेच चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. सदर आरोपामुळे पालकवर्गात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील या गावात सर्वेश अशोक धोंडी या १६ महिन्याच्या मुलास एका नर्सने घरी जाऊन एम.आर. आणि ट्रिपल बुस्टर डोस दिला. १० फेब्रुवारी रोजी हा डोस देण्यात आला त्यावेळी ९ तारखेलाच मुलाला १६ महिने पूर्ण झाले आहेत त्यामुळे उशिराने डोस द्यावा असे आपण सांगूनही नर्सने ऐकले नाही असा आरोप मयत सर्वेश अशोक धोंडी याच्या आईने केला आहे. नर्सने डोस दिल्यानंतर थोड्या वेळातच सर्वेशला ताप आला पण डोस दिल्याने ताप आला असेल असे समजून नर्सने दिलेले औषध त्याला देण्यात आले पण त्याला आराम मिळाला नाही. 


सर्वेशची प्रकृती अधिकच बिघडत गेल्याने त्याला जवळच्याच खाजगी दवाखान्यात नेण्यात आले पण मुलाला खूप ताप असल्याने आणि आकड्या येत असल्याने तेथे उपचार दिले गेले नाहीत. तेथील डॉक्टरांनी सर्वेशला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले पण उपचाराच्या आधीच १६ महिने वयाच्या सर्वेशचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत असून आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.  


मृत्युमुखी पडलेल्या सर्वेशच्या कुटुंबीयांनी मोखाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. आरोग्य विभागाने देखील याची गंभीर दखल घेतली असून आरोग्य विभागाच्या वतीने देखील चौकशी सुरु केली आहे. अवघ्या १६ महिन्याच्या मुलाचा अशा प्रकारे प्राण गेल्याने मात्र परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !