BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ जाने, २०२२

सोलापूर जिल्ह्यातील शाळांचा निर्णय बुधवारपर्यंत !

 


 

सोलापूर : कोरोनाच्या भीतीने बंद असलेल्या शाळा सुरु करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला असला तरी सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत बुधवारपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे. 


राज्य शासनाने शाळा सुरु करण्याच्या बाबतील 'निर्णय शासनाचा, जबाबदारी प्रशासनाची' असाच काहीसा पवित्रा घेतला आहे.  राज्य सरकारने सोमवारपासून शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला पण स्थानिक प्रशासनाकडे जबादारीचे ओझे टाकून रिकामे झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोना वाढतोय आणि शाळा सुरु करण्याबाबत पालक, विद्यार्थी यांची मागणीही वाढतेय. सोलापूर महानगर पालिका आयुक्त यांनी सोलापूर शहरातील शाळा सुरु करण्याबाबत घाई केली नाही उलट आठ दिवसानंतर यावर निर्णय घेऊ असे आयुक्तांनी सांगितले आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्याबाबत जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे  प्रस्ताव सदर केलेला आहे पण जिल्हाधिकारी यांनी अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. कोरोनाची वाढती परिस्थिती पाहून सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत प्रशासनही राजी नसल्याचे दिसत आहे. 


शाळा सुरु करण्याबाबत शासनाने निर्णय घेऊन जिल्हा प्रशासनाकडे पुढील जबाबदारी सोपविली असली तरी अशा कठीण परिस्थितीत शाळा सुरु करणे जोखमीचे ठरू शकते त्यामुळे यावर अद्याप निर्णय झालेला नाही आणि आज मात्र जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्री यांच्याकडे बोट दाखवले आहे. पालकमंत्री हे राज्य शासनाचा भाग आहेत आणि राज्य शासनाने शाळेबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर ढकलली आहे. आता स्थानिक प्रशासनाने पुन्हा शासनाचा भाग असलेल्या पालकमंत्री यांच्याकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे एक प्रकारे हा खो खो चा खेळ सुरु असल्यचे दिसत आहे.  कोरोनाचे रुग्ण अगदीच कमी असलेल्या गावात तरी कोरोना नियामंचे पालन करून शाळा सुरु कराव्यात अशी मागणी होताना दिसत आहे तर अशा गंभीर परिस्थितीत शाळा सुरु केल्या जाऊ नयेत अशीही मागणी होताना दिसत आहे त्यामुळे प्रशासनापुढे पेचाचा प्रसंग उभा राहू शकतो. 


दरम्यान जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्यावर निर्णय ढकलला असून भरणेमामा हे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत . शाळा सुरु करण्याबतचा निर्णय तेच घेतील परंतु कोरोना रुग्णांच्या स्थितीचा आढावा घेऊनच याबाबत निर्णय होऊ शकतो असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीतच याबाबत निर्णय होऊ शकतो. हा निर्णय बुधवारपर्यंत समजण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांची संख्या सोलापूर जिल्ह्यात वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरु होण्याची शक्यता धूसर असल्याने वृत्त 'शोध न्यूज' ने आधीच दिले होते. 



'शोध न्यूज' ने आधी दिलेले वृत्त !


सोलापूर : कोरोनाची तिसरी लाट आली असली तरी शासनाने राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला आहे पण सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरु होण्याची शक्यता धूसर असल्याचे संकेत मिळत आहेत. 


कोरोनाचे रुग्ण राज्यात सगळीकडेच वाढत असून कोरोनाचा आलेख चढता आहे. शासन एकेक निर्बंध लागू करीत असताना मात्र राज्यातील शाळा सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय वादात सापडला असल्याचेही दिसत आहे, राजकीय विरोधकांनी नेहमीप्रमाणे या निर्णयावर टीका केली असली तरी ती 'राजकीय' आहे याची सर्वांनाच जाणीव आहे आणि केवळ टीका करण्याचेच काम केले जाते त्यामुळे त्याकडे कुणी गंभीरपणे पहिले नसले तरी जनमानसात या निर्णयाचे आश्चर्य मात्र व्यक्त होत आहे. काही पालक आणि विद्यार्थी शाळा सुरु करण्याची मागणी करीत असले तरी कोरोनाची परिस्थिती शाळा सुरु करण्यायोग्य नाही हे दिसत आहे. त्यामुळे या निर्णयावर पालक आणि विद्यार्थी संभ्रमित झाले आहेत. 


राज्य शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर टाकली आहे. सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता कोरोनाचे नवे रुग्ण रोज वाढत्या आकड्याने आढळून येत आहेत त्यामुळे स्थानिक प्रशासन गंभीर आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरु करण्याचा निर्णय प्रशासन घेण्याची शक्यता दिसत नाही. सोलापूर जिल्ह्यातील १ हजार ८७ माध्यमिक शाळा आणि सुमारे तीन हजार प्राथमिक आणि खाजगी शाळा सुरु करण्याबाबत जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सदर केला आहे परंतु जिल्हाधिकारी यांनी याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. सोलापूर महानगरपालिकेने मात्र शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय आठ दिवसांनी घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे, त्यामुळे सोलापूर शहरातील शाळा अजून आठवडाभर तरी सुरु होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण बाबत देखील असाच निर्णय येण्याची शक्यता नाकारता येत नाही.   


शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी जबाबदारी मात्र स्थानिक प्रशासनावर टाकली आहे आणि सोलापूर जिल्ह्यात कोरोना वाढत असून लाखो लोकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाही. कोरोना प्रतीबंधात्मक नियम लोक बेदखल करताना दिसतात. अशा परिस्थितीत प्रशासकीय अधिकारी शाळा सुरु करण्याच्या मानसिकतेत नक्कीच असणार नाहीत. शाळा सुरु केल्या तरी अशा घातक परिस्थितीत पालक मुलांना शाळेत पाठविण्याची शक्यताही कमी आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकूण परिस्थिती पाहिली तर शाळा लगेच सुरु होतील असे चित्र दिसत नाही त्यामुळे ही शक्यता आता धूसर होत चालली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !