BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ जाने, २०२२

-- म्हणून पोलीस अधिकारी सायकलवरून आले पंढरीला !



पंढरपूर : प्रवासाची अनेक साधने उपलब्ध असताना एक पोलीस अधिकारी देहूपासून तब्बल २३४ किलोमीटर अंतर सायकलवरून प्रवास करीत पंढरीत पोहोचले आणि एक संदेश देत परतही गेले आहेत. 


हल्ली माणूस एक किलोमीटर अंतरापर्यंत जायचे असले तरी लगेच गाडीला किक मारतो. गाडीची काही अडचण असेल तर काम रद्द करतो किंवा पुढे ढकलतो. एवढी गाडीची सवय लागून गेली आहे. चार पावलं पायी चालणं आता जीवावर येऊ लागले आहे आणि त्यामुळे शरीराला व्यायाम मिळणे बंद झाले असून त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर दिसत आहे. ऐन विशीतल्या तरुणालाही स्थूलपणाने ग्रासले आहे आणि स्थूलपणा अनेक आजारांना शरीरात प्रवेश देत असतो. हे सगळ्यांनाच माहित आहे पण शारीरिक फिटनेसबाबत प्रत्यक्ष कार्यवाही करणारे फार थोडे लोक आहेत. आणि याचसाठी एक पोलीस अधिकारी देहू येथून २३४ किमी अंतर सायकलवरून आले आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देऊन गेले. 


हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे हे शारीरिक तंदुरुस्तीबाबत सदैव जागरूक असतात. धावणे, सायकलिंग, पोहोणे असे व्यायाम सतत करून आपला फिटनेस कायम ठेवत असतात. फिटनेसचा हा संदेश देण्यासाठी त्यांनी देहू ते पंढरपूर अशी सायकल वारी केली आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश त्यांनी दिला. देहू येथे संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेऊन त्यांनी आपली सायकल वारी सुरु केली आणि ते थेट पंढरपूर येथे आले. विशेष म्हणजे त्यांनी या प्रवासात फक्त एकदाच आणि तो देखील अवघ्या दहा  मिनिटांचा थांबा घेतला. सलग आठ तास सायकल चालवत ते पंढरीत दाखल झाले. 


शारीरिक तंदुरुस्ती जीवनभर आवश्यकच आहे पण कोरोनाच्या या काळात तर याला अधिक महत्व आहे. या काळात पौष्टिक आहार आणि योग्य व्यायाम अत्यावश्यक असून रोज किमान एक तास तरी आपल्या तंदुरुस्तीसाठी आवश्यक आहे त्यामुळे प्रत्येकाने शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक राम  गोमारे यांनी केले.

  

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !