मुरबाड : शिपाई पदावरून आरोग्य खात्यातून निवृत्त होताच पट्ठ्याने आपल्याच घरात दवाखाना सुरु केला आणि आयुष्यभर कार्यालय झाडण्याचे काम करणाऱ्या या शिपायाने चक्क रुग्णावर उपचार सुरु केले. मग व्हायचे तेच झाले आणि पाच जणांचा जीव घेऊन शेवटी तुरुंगात जाऊन बसला !
डॉक्टरच्या गैरहजेरीत अनेक छोट्या रुग्णालयातील कम्पाउंडर स्वतःला डॉक्टर समजत असतात आणि डॉक्टरांच्या रुबाबात रुग्णांना काही फुकटचे सल्ले देण्याचे काम करीत असतात हे अनेकदा पाहायला मिळते. कसलीही वैद्यकीय पदवी नसताना काही बोगस डॉक्टर दवाखाने उघडून बसतात आणि गल्ला भरून घेतात. हे करता करता कधी एखाद्या रुग्णांचा प्राण देखील जात असतो पण यांना केवळ पैसा दिसत असतो. कुठे न कुठे बोगस डॉक्टर सापडल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात तर अनेकांचे कामं बिनबोभाट सुरूही असते. ठाण्याच्या मुरबाड येथे मात्र एका निवृत्त शिपायालाच थेट डॉक्टर होऊन पैसा कमाविण्याची इच्छा झाली पण जेंव्हा पाच जीव त्याने घेतले तेंव्हा कुठे त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या.
धसई नावाचे गाव खूप चर्चेत आले होते आणि या गावाचे मोठे कौतुकही झाले होते. देशातील पहिले कॅशलेस गाव म्हणून हे गाव चर्चेत आले होते पण आता हे गाव वेगळ्याच कारणाने चर्चिले जाऊ लागले आहे. येथेच एका बोगस डॉक्टरने केलेल्या उपचारामुळे पाच जणांचा प्राण गेला आहे. आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून आयुष्यभर काम केले. आरोग्य केंद्रातील पडेल ती कामे करायची, डॉक्टर, नर्स यांचे सामान उचलायचे एवढेच त्याला माहित होते. हे करता करता कानावर काही शब्द पडायचे. हा पांडुरंग घोलप प्राथमिक आरोग्य केंद्रातून शिपाई पदावरून निवृत्त झाला.
निवृत्त झाल्यावर बसून काय करायचे ? शिवाय केवळ पेन्शन च्या तुरापूंजा रकमेवर घरखर्च कसा भागायचा ? असे काही प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले असावेत. त्याने सरळ डॉक्टर बनायचे ठरवले आणि घरातच दवाखाना देखील सुरु केला. आयुष्य प्राथमिक आरोग्य केंद्रातच घालविल्यामुळे काही जुजबी माहिती त्याला होतीच, त्याचाच फायदा उठवायचा त्याने ठरवले. मनात आलेली कल्पना त्याने अमलात देखील आणली आणि आपल्याच घराचा त्याने दवाखाना बनवला. रुग्ण यायला लागले आणि हा बहाद्दर त्यांच्यावर उपचार देखील करू लागला. पण सत्य कधी ना कधी आपोआप बाहेर येते तसे घडले आणि त्या घोलपाचे बिंग फुटले!
चार पाच दिवसांपूर्वी राम भिवा आणि त्याची लग्न झालेली मुलगी अलका मुकणे याना ताप आणि अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. ते दोघे या बोगस डॉक्टर पांडुरंग घोलपकडे उपचारासाठी गेले. घोलप यांच्याकडे उपचार घेतल्यावर त्यांची प्रकृती आणखीच खालावली. त्यामुळे त्यांनी धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. अलका मुकणे यांची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडत चालली त्यामुळे त्यांना उल्हासनगर शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. अखेर त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान राम भिवा याचा तर मृत्यूदेखील झाला होता.
शिपायाचा डॉक्टर झालेल्या पांडुरंग घोलप यांच्याकडे उपचार घेतलेल्या बारकूबाई वाघ, आशा नाईक, लक्ष्मण मोरे यांचा देखील या आधीच मृत्यू झाला होता. घोलप यांच्याकडे उपचार घेतलेल्या पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात चर्चा होऊ लागली. आदिवासी क्रांती सेनेने मात्र या प्रकरणी आवाज उठवला तेंव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. उमेश वाघमोडे यांनी या बोगस डॉक्टरांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली. वैद्यकीय व्यवसायाचा कसलाही परवाना नसताना पांडुरंग घोलप याचा दवाखाना जोमात होता पण अखेर त्यालाच कोमात जाण्याची वेळ आली. त्याच्यावर झाला आणि पोलिसानी त्याला बेड्या ठोकल्या. घोलप याच्या उपचाराने मृत्युमुखी पडलेले पाचही रुग्ण आदिवासी आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !