सुसाईड नोट मिळाली !
पंढरपूर : अनिलनगर येथे तरुणाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा बाहेर आला असून ही आत्महत्या सावकारी जाचातूनच झाली असून या प्रकरणी एका संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
अनिलनगर भागात घडलेल्या घटनेत संतोष प्रकाश साळुंखे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संतोष याचे वय २६ वर्षांचे होते. अनिलनगर परिसरात म्हसोबा मंदिराच्या जवळ राहणाऱ्या संतोष साळुंखे याने छताला साडी बांधून गळफास घेतला आणि आपल्या जीवनाची अखेर केली. स्वप्नील टमटम यांनी या घटनेची खबर पंढरपूर शहर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद करून पुढील कार्यवाही सुरु केली. सदर आत्महत्या कशासाठी केली याचे नेमके कारण समोर आले नव्हते पण पोलीस तपास करीत होते. सदर आत्महत्या ही सावकारी पाशातून झाल्याची चर्चा सुरु होती पण ठोस काही पुढे येत नव्हते. अखेर याबाबत बरीच माहिती समोर येऊ लागली असून सावकारी दहशतवादानेच संतोषचा बळी गेला असल्याचे असल्याचे निष्पन्न होऊ लागले आहे.
पंढरपूर शहरात बेकायदा सावकारी आधीपासूनच बोकाळली आहे पण त्याला वाचा फुटत नाही त्यामुळे अनेक प्रकरणे बाहेर येत नाहीत. या घटनेबाबत मात्र आत्महत्या झाल्याने आरोपींच्या नावासह फिर्याद देण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या संतोष साळुंखे याला सावकाराने दिलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासातून ही आत्महत्येची घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सावकाराने संतोष साळुंखे याचे घर बळजबरीने लिहून घेतले होते आणि त्याला मारहाणही करण्यात आली होती अशी धक्कादायक माहिती फिर्यादीत समोर आली आहे. मयत संतोष याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली एक चिट्ठी पोलिसांना मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या सुसाईड नोट मध्ये संतोष याने आरोपींची नावे आणि आत्महत्येने कारण लिहिले असल्याने या आत्महत्येचे रहस्य बाहेर आले आहे.
मयत संतोष साळुंखे याचा भाऊ पांडू प्रकाश साळुंखे याने पंढरपूर शाहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शेखर दत्तात्रय कुंदुरकर, त्याची बहिण सुवर्णा अंकुश बिडकर, सुवर्णाचा पती अंकुश रामा बिडकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार शेखर दत्तात्रय कुंदूरकर याला पोलिसांनी अटक केली आहे. मयत संतोष साळुंखे याने आरोपीकडून व्याजाने पैसे घेतले होते. सदरची रक्कम व्याजासह परत करण्यात आली होती तरीही आरोपीने संतोषकडे जादा व्याजाच मागणी केली आणि वसुलीसाठी संतोष यास मारहाण करून घरच्या लोकांना मारून टाकतो अशी धमकी दिली. मयत संतोष साळुंखे याच्याकडून घराची विक्री केल्याची नोटरी जबरस्तीने करून घेतली.यामुळे संतोष साळुंखे यास मानसिक आणि शारीरिक त्रास झाला. यातून त्याने आत्महत्या करण्याची घटना घडली अशा प्रकारची फिर्याद देण्यात आली आहे.
संतोष याच्या आत्महत्येनंतर ही आत्महत्या सावकारीच्या जाचातून झाली असल्याची चर्चा सुरु झाली होती आणि अखेर ही चर्चा खरी असल्याचेच समोर आले आहे. पंढरीत बेकायदा सावकारी आणि या सावकारीतून गुन्हेगारी फोफावत आहे पण आता तर त्यांच्या जाचातून आत्महत्याही होऊ लागली असल्याने अवैध सावकारीचा पुरता बिमोड करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. संतोष साळुंखे याच्या आत्महत्येतील अनेक धागेदोरे आता पोलीस तपासात बाहेर येण्याची शक्यता आहे. सावकारी जाच असह्य झाल्याने संतोष साळुंखे याच्यासारख्या तरुणाने आपले जीवन संपविले याची मात्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !