BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ जाने, २०२२

नुसता राडा ! पठ्ठ्या चिडला आणि ग्रामपंचायतीचा संगणकच फोडला !


 

पंढरपूर : तालुक्यातील केसकरवाडी इथला एक पठ्ठ्या चिडला आणि मग काय, त्याने थेट ग्रामपंचायतीचा संगणकच (मॉनिटर) फोडला ! कुणाचा राग आणि कुणावर काढला हे त्याला तरी समजलं की नाही हे मात्र कुणालाच नाही समजलं !


राग अनावर झाला की माणूस कधी काय करील हे सांगता येत नाही याचा एक धम्माल अनुभव पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी येथे आला. 'राग आणि भिक माग' अशी एक म्हण आपल्याकडं प्रचलित आहे. रागाच्या भरात माणूस हमखास नको ते करून बसतो आणि पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ येते. पण पुन्हा पश्चाताप करूनही काही उपयोग होईलच असे नसते. क्षणभर आलेल्या रागाने त्याला आता तुरुंगात जाण्याची वेळ आणली आहे. 


तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतीत ग्रामस्थांची कामे होत नाहीत आणि झाली तर वेळेवर होत नाहीत अशा तक्रारी कायम असतात. ग्राम पंचायतीत शासनाने सगळ्या सुविधा दिलेल्या असतात पण ग्रामसेवक आणि सरपंच सापडत नाहीत. सरपंच निदान घरी भेटलीत तरी, ग्रामसेवक भेटणे ही तशी दुर्मिळ बाब, आणि कधी नशिबाने या महोदयाची भेट झालीच तर ते वेळेत काम करतील याची शाश्वती नसते. त्यात गावकरी जर सरपंचांच्या विरोधी गटातील असला तर मग कल्याणाच ! हे जरी खरं असलं तरी चुकीच्या पद्धतीने राग काढून काही उपयोग नसतो पण राग आल्यावर एवढा विवेक जागा रहात नसतो. 


पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी येथील भारत देशमुख हे ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले. त्यांना त्यांच्या पतीचा मृत्यूचा दाखला हवा होता म्हणून ते येथे आले. ग्रामपंचायत कार्यालात ग्रामसेवक तर नव्हतेच पण सरपंच नव्हते. सहदेव बाळू ढोबळे हा तरुण शिपाई मात्र आपल्या नोकरीवर इमाने इतबारे हजर होता. या शिपायाने भारत देशमुख यांना ग्रामसेवक नसल्याचे सांगितले. 'ग्रामसेवक अथवा सरपंच आल्यावर दाखला घेऊन जा'  असे या शिपायाने सांगितले खरे, पण देशमुख यांना यात नेमका कशाचा आणि कुणाचा राग आला होता माहित नाही. त्याने शिपायालाच धमकवायला सुरुवात केली. 'तुला लय मस्ती आलीय काय ? तू ऑफिसच्या बाहेर ये, तुला दाखवतोच' असे म्हणत ग्रामपंचायत कार्यालातील टेबलवर असलेले एक रजिस्टर उचलले आणि देशमुख यांनी दरवाजाच्याही बाहेर फेकून दिले. हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही. देशमुख यांनी दगड हातात घेऊन ग्रामपंचायतीच्या संगणकाचा  मॉनिटर देखील फोडून टाकला आणि नुकसान केले.  अशा प्रकारची फिर्याद शिपाई सहदेव ढोबळे यांनी पोलिसात दिली आहे. रागावर आवर न घातल्याने दाखला तर मिळालाच नाही पण आता पोलिसांचा ससेमिरा आणि न्यायालयातील हेलपाटे मात्र मारावे लागणार !






  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !