BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ जाने, २०२२

निर्बंधात बदल ! राज्यातील दुकानेही रहाणार आता ठराविक वेळेत बंद !

 



मुंबई : राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधात आता पुन्हा एकदा बदल केला असून अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानासाठी आता वेगळा निर्णय घेण्यात आला आहे. 


कोरोनाचा राज्यात प्रभाव वाढतच असून त्या  अनुषंगाने राज्य शासनाने दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. हा निर्णय लागू करतानाच आणखीही काही नियम लागू केले असून नियम न पाळणाऱ्याना मोठा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली असून हा आदेश सद्या अमलात आणला जात आहे. ८ जानेवारीपासून राज्यात सगळीकडे हे नवे नियम लागू झाले असतानाच शासनाने या आदेशात अंशत: बदल करून ब्युटी पार्लर आणि जीममध्ये ५० टक्के क्षमतेने आणि नियम पाळून सेवा देण्यासाठी मान्यता देण्यात आली. या सुधारणेनंतर आता पुन्हा एकदा याच आदेशात बदल करण्यात आला असून हा बदल राज्यातील अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानांच्या संबंधात आहे.



कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेवेळी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते तसे निर्बंध यावेळी नाहीत, कुणाची रोजी रोटी बंद केली जाणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलेच आहे पण नियम पाळावे लागतील याचीही जाणीव करून दिलेली आहे. दुकानदाराना दिवसभर नियम पाळून आपले उद्योग व्यवसाय करता येणार आहेत पण आता राज्यातील सर्व ठिकाणी अत्यावश्यक सेवेत  नसलेली दुकाने रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवली जावीत असा आदेश देण्यात आला आहे. साधारणपणे व्यापारी या वेळेपर्यंत दुकाने बंद करीत असतातच त्यामुळे दुकानदारांनी याची फारशी झळ पोहोचणार नाही. मोठ्या शहरात जे व्यवसाय रात्रीच चालतात त्यांना मात्र रात्री दहा वाजता शटर बंद करावेच लागणार आहे. 


कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करता येणार आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येत असलेल्या व्यक्तीचे दोन्ही डोस पूर्ण असणे बंधनकारक आहे. बाकीचे सर्व नियम शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच आहेत परंतु त्यात अंशत: सुधारणा करून रात्री दहा वाजल्यानंतर दुकाने बंद ठेवण्याचा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ नसलेली सर्व दुकाने रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.  







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !