1
नवी दिल्ली : कोरोनाचा वेळ वाढतच निघाला असून देशात गेल्या २४ तासात २ लाख ६८ हजार ८३३ नव्या रुग्णांची भर पडली असून ४०२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाची तिसरी लाट पहिल्या दोन्ही लाटेपेक्षा वेगळी आणि वेगवान आहे, खूपच वेगाने प्रसार होत असल्यामुळे नव्या रुग्णात होणारी वाढ लक्षणीय आणि धक्कादायक ठरू लागली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत दुसर्या दिवशी मोठी वाढच झाल्याचे रोज समोर येऊ लागले आहे. देशभरात २४ तासात २ लाख ६८ हजार ८३३ एवढे नवे रुग्ण सापडले आहेत. आदल्या दिवसांपेक्षा ४ हजार ६३१ रुग्ण अधिक आढळून आले आहेत. २४ तासातील मृत्यूची संख्या ४०२ झाली आहे. ही सगळीच वाढती आकडेवारी चिंताजनक आणि धक्कादायक ठरू लागली आहे. मागील २४ तासांच्य आकालावधीत १ लाख २२ हजार ६८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ओमीक्रोनची रुग्णसंख्या ६ हजार ४१ झाली आहे. देशभरात एकूण १४ लाख ७७ हजार ८२० सक्रीय रुग्ण आहेत. आणि यात रोज वाढ होताना दिसत आहे.
महाराष्ट्रात देखील कोरोना वाढीचा वेग अधिक असून सोलापूर जिल्ह्यातील वाढती आकडेवारी देखील रोज धडकी भरवू लागली आहे. त्यात बार्शी, माढा आणि पंढरपूर या तीन तालुक्यांनी चितेत भर घातली आहे. मागच्या दोन्ही लाटेत पंढरपूर तालुक्यातील बाधित आणि मृत्यूंची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक होती आणि यावेळीही पंढरपूर तालुका आघाडीवर जात आहे. बार्शी तालुक्यात सद्या २१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पंढरपूर तालुक्यात १२१ तर माढा तालुक्यात १०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्हा ग्रामीणमधील रुग्णांची संख्या आता ७६१ वर पोहोचली आहे. रोजची वाढ ही चिंता निर्माण करणारी असून नागरिकांच्या मनावर कोरोनाचे दडपण आता अधिक गडद होताना दिसत आहे. नागरिकांनी वेळीच दक्षता नाही घेतली आणि नियमांचे पालन नाही केले तर परिस्थिती यापेक्षाही धक्कादायक व्हायला वेळ लागणार नाही. आजही रस्त्यावर अनेक लोक विनामास्क भटकताना दिसत असून त्यांच्या कोरोनाचे कसलेही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
कोरोनाचे समोर येणारे आकडेच विचारात घेतले जात आहेत पण असंख्य लोक मेडिकल दुकानातून टेस्टिंग किट घेऊन जात आहेत आणि घराच्या घरी तपासणी करीत आहेत. त्यामुळे रुग्णांचा नेमका आकडा मिळण्यात अडचण झाली आहे. घरीच तपासणी केल्यानंतर बाधित आढळले तरी त्यांची नोंद कुठेच होत नाही त्यामुळे समोर येणाऱ्या आकड्यापेक्षा अधिक आकडा बधीताचा असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने अशा कीट विक्रीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. एकट्या मुंबईतील मेडिकल दुकानातून तब्बल ३ लाख कीट ची विक्री झाली आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून होणारी विक्री किती असून शकेल याचा अंदाज सहज लावता येतो. या तपासणीतील बाधितांची नोंद मात्र कोठेच होत नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !