BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ जाने, २०२२

उजनी धरणातून जानेवारी अखेरीस सोडणार पाणी !

 



सोलापूर : शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आली असून उजनी धरणातून २७ जानेवारी पासून कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 


उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरले असून यावर्षी उजनी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. सोलापूर जिल्हा हा रब्बी पिकांचा जिल्हा म्हणून परिचित आहेच, पण गेल्या काही वर्षांपासून परिसरात साखर कारखाने वाढले आणि त्यामुळे उसाचे क्षेत्रही सतत वाढत गेले आहे. त्यामुळे रब्बीसह खरीप पिकात देखील वाढ झाली आहे. ही वाढ रब्बीच्या तुलनेत खरीपाची अधिक वाढ झाल्याने जलसंपदा विभागाला उजनीचे पाणी सोडण्याच्या नियोजनात बदल करावा लागला आहे. रब्बी पिकांचे क्षेत्र लक्षणीय असल्यामुळे शेती पिकांसाठी पाणी सोडण्यात यावे अशी शेतकऱ्याची मागणी वाढत आहे. शेतकरी बांधवाची ही वाढती मागणी लक्षात घेता जलसंपदा विभागाने जानेवारी महिन्याच्या अखेरीस म्हणजे २७ जानेवारी पासून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. 


उजनी कालव्यासह बोगद्यातूनही पाणी सोडले जाणार असून कालव्यातून सुमारे ५ टीएमसी पाणी सोडले जाण्याचे नियोजन आहे. जानेवारी महिन्यात हे पाणी सोडल्यानंतर फेब्रुवारीत दुसरे आवर्तन सोडण्याची शक्यता आहे.  यावर्षी उशिरापर्यंत नदीत पाणी राहिले आणि शेतकऱ्यांचे पाण्याचे साठे भरलेल्या अवस्थेत राहिल्यामुळे उजनी धरण वजा पातळीपर्यंत यावर्षी जाणार नाही असा जलसंपदा विभागाचा कयास आहे. जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याचे नियोजन केले असून अंतिम निर्णय कालवा सल्लागार समिती घेणार आहे. सद्या उजनी धरणात श्संभार टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे आणि जानेवारी महिना अर्धा झालेला आहे. त्यामुळे यावर्षी उजनीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना आदिक तिष्ठत बसण्याची वेळ येणार नाही.  


वाचा : दूधवाल्याने केली दरोडेखोरांना पळता भुई थोडी !


मागच्या वर्षी समाधानकारक पाउस झाला आहे त्यामुळे या वर्षी पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता नाही. बोगदा आणि कालव्यातून पाणी सोडले जाणार असले तरी भीमा नदीच्या पात्रातून सद्या पाणी सोडण्यात येणार नाही. औज आणि चिंचपूर बंधारा येथून सोलापूर शहराला पाणी पुरवठा होत असतो आणि या दोन्ही धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. सोलापूर महानगर पालिकेकडूनही पाणी सोडण्याची मागणी झालेली नाही. अशी मागणी प्राप्त झाल्यानंतर भीमा नदीच्या पात्रातून पाणी सोडले जाणार आहे.   


 




 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !