मुंबई : महाराष्ट्राला लवकरच मास्कपासून सुटका मिळेल यावर कालपासून राज्यात जोरदार चर्चा सुरु झाली असली तरी एवढ्यात तरी चेहऱ्यावरचा मास्क हटणार नाही हेच स्पष्ट झाले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून शासनाने चेहऱ्यावर मास्क लावणे सक्तीचे केले आहे. मास्क नसेल तर त्याला दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. आता तिसरी लाट सुरु असून कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे पण राज्य शासन महाराष्ट्र मास्क मुक्तीचा विचार करीत आहे अशी चर्चा सुरु झाली आहे. युरोप, इंग्लंड, फ्रांस तसेच अनके देशांनी आता मास्क न वापरण्याची भूमिका घेतलेली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील विचार सुरु झाला असल्याचे दिसत आहे. मास्क न वापरण्याची भूमिका काही देशांनी घेतली असल्याने तशी भूमिका घेता येईल काय ? याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे. याबाबत शासन टास्क फोर्स सोबत चर्चा करणार आहे आणि टास्क फोर्सच्या निर्णयानंतरच मास्क बाबत धोरण जाहीर केले जाणार आहे अशीही माहिती बाहेर आली आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्माण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणाची मोहीम जगभर राबविण्यात येत आहे. काही देशांनी वेगाने लसीकरण पूर्ण केले असून तेथे कठोर निर्बंध हटविण्यात आले आहेत तसेच मास्कपासून मुक्ती देण्यात आली आहे. राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा सुरु झाल्याचे आणि राज्यात देखील अशी सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे सांगितले जात असतानाच मंत्रीमंडळाच्या बैठकीत अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मास्क हा आवश्यकच असल्याने तो वापरावाच लागेल असे देखील ते म्हणाले आहेत.
दरम्यान याबाबत टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती काही माध्यमांनी दिली होती. कोरोना निर्बंध आणि नियम याबाबतचे धोरण टास्क फोर्स ठरवत असते त्यामुळे साहजिकच टास्क फोर्सच्या निर्णयाशिवाय कुणाच्याही चेहऱ्यावरील मास्क हटणार नाही. अर्थातच राज्याचे लक्ष टास्क फोर्स कडे लागले आहे पण टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी एका वाक्यात ही शक्यता फेटाळून लावली आहे त्यामुळे एवढ्या लवकर तरी मास्क चेहऱ्यावरून बाजूला जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
कोविड टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी 'पुढील काही महिने तरी हे शक्य नाही' असे सांगून या चर्चेतील हवाच काढून टाकली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अजूनही लसीकरण पूर्ण झालेले नाही. मुंबई शहरात लसीकरणाची टक्केवारी चांगली आहे पण बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. ओमीक्रोन पासून बचाव करण्यासाठी मास्क हे आपल्याकडील शस्त्र आहे. मास्कमुळे आपण सुरक्षित राहू शकतो आणि इतरानाही संसर्ग होऊ शकत नाही. त्यामुळे आजच्या स्थितीत तरी मास्क मुक्त समाज ही कल्पना अजून काही महिने तरी शक्य वाटत नाही असे डॉ. पंडित यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
कालपासून राज्यात सुरु झालेल्या या चर्चेमुळे आशा आणि दिलासा वाटू लागला होता पण कोरोनाची परिस्थिती पहिली तर हे शक्य नसणारी बाब असल्याचेही दिसत होते. आता तर टास्क फोर्स सदस्यांनीच याबाबत आपले मत स्पष्ट केले असल्याने काही महिने तरी मास्कपासून सुटका होणार नसून कालपासून उठणाऱ्या वावड्या हवेत विरून गेल्या आहेत. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून आपले संरक्षण आणि इतरांना होणारा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर सुरु ठेवणेच हिताचे आहे.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !