BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० जाने, २०२२

शिवसेनेची लक्तरे टांगून शहाजीबापू पाटील यांचे माध्यमांवर खापर !

 



पंढरपूर : शिवसेनेची लक्तरे वेशीवर टांगून भाजपचे गोडवे गायलेले शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी माध्यमावर खापर फोडत दुसऱ्याच दिवशी घुमजाव केले असून आपण नाराज नसल्याचे म्हटले आहे.


देश आणि राज्य पातळीवर शिवसेना आणि भाजप यांच्यात अंतर्गत धगधगता संघर्ष सुरु असताना शिवसेनेचेच असलेले आमदार शहाजीबापू पाटील यांनी पंढरपूर येथील एका कार्यक्रमात शिवसेना  आणि महाविकास आघाडी सरकारला दुखावणारी विधाने त्यांनी केली होती. सांगोल्यात शिवसेनेची फक्त अकरा हजार मतं असल्याचे त्यांनी सांगितल्याने शिवसेनेचा दुबळेपणा समोर आला होता. एवढ्यावरच बापू थांबले नाहीत तर आपण भाजपमुळे आमदार झाल्याचे त्यांनी जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितले होते. शहाजीबापूंची भाषणे त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून गाजणारी ठरली आहेत पण पंढरपूर येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी नकळत शिवसेनेला कमी लेखत भाजपचे गुणगाण गायले होते. पर्यायाने आपल्याच सरकारचे आणि पक्षाचे वाभाडे त्यांच्या विधानातून निघाले होते. भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांना केंद्रात मंत्री करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असेही सांगितले होते. 


शिवसेनेचे आमदार असताना शहाजीबापू पाटील यांनी जी पक्षविरोधी विधाने केली त्याची चर्चा खूपच झाली. एवढेच नव्हे तर त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला. बापूनी थेट शिवसेनेलाच डिवचले आणि अंगावर घेतले होते, त्यामुळे याचे प्रतिध्वनी मुंबईपर्यंत उमटणार हे देखील तितकेच स्पष्ट होते. त्यांची विधाने शिवसैनिक आणि पदाधिकारी यांना मुळीच आवडली नाहीत उलट त्यांच्यात प्रचंड नाराजीच सूर आज दिसत होता.  बापू कुठल्याही पक्षात असले तरी सर्व पक्षात त्यांचे संबंध चांगलेच आहेत. त्यामुळे उघड कुणी काही बोलताना दिसले नाहीत. 


तसं पाहिलं तर आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या मनातील व्यथा अथवा खदखद बोलून दाखवली. जवळपास ३० वर्षे काँग्रेसमध्ये राहिले पण कॉंग्रेसने त्यांना काही दिलेले नाही. शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाल्यावर त्यांना मंत्रीपद मिळावे असे वाटले असणार. तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे राज्यभर मंत्रीपदे वाटता आलेली नाहीत पण बापू यांनी आमदार बबनदादा शिंदे यांचे नाव पुढे करीत आपल्या मनातील व्यथा बोलून दाखवली होती. शिवसेनेला थेट डिवचणे हे तसे हिमतीचे काम असून भविष्यात याचा काय फटका बसतोय हे देखील पाहावे लागेल. शिवसेनेची ११०० मते म्हणताना त्यांनी भाजपची किती मते हे देखील सांगून टाकायला हवे होते कारण भाजपची तरी सांगोल्यात किती शक्ती आहे हे तरी या निमित्ताने समोर आले असते. भाई गणपतराव देशमुख यांच्याही आशिर्वाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 


काल जे काही घडले त्याचा इतिवृतांत मुंबईपर्यंत गेला असावा आणि मुंबईवरून मोठे इंजेक्शन बसले असावे आणि त्यामुळेच आज बापूनी लगेच आपला जमेल तसा खुलासा केला असण्याची शक्यता आहे. हा खुलासा करताना त्यांनी प्रसार माध्यमांवर खापर फोडले आहे. पण त्यांची विधाने मोडून तोडून दाखविण्याचा विषय तितकासा मजबूत नाही, कारण त्यांच्या भाषणाचा व्हिडीओच व्हायरल झाला आहे आणि त्यांचे प्रत्येक वाक्य सर्वांनी त्यांच्या तोंडूनच ऐकले आहे. त्यामुळे माध्यमावर खापर फोडण्याचा त्यांचा प्रयत्न तितकासा यशस्वी होताना दिसला नाही. विधानांची मोडतोड झालीच असती तर कुणी एकाद्या दुसऱ्याकडून झाली असती. सर्वच माध्यमात एकाच पद्धतीचे वार्तांकन झाले असून सोबत जसाच्या तसा व्हिडीओ उपलब्ध आहे. 


काय म्हणाले बापू ?

"परवा झालेल्या पंढरपूरच्या हॉस्पिटल उद्घाटनाच्या समारंभात झालेले माझे भाषण आणि त्यातील काही वाक्य निवडक उचलून अनेक चनेलनी मी शिवसेनेवर नाराज असलेला आमदार असे चित्र उभे केले आहे. मी शिवसेनेवर कुठेही नाराज नाही, पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त माझ्या मतदार संघात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि उप मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी निधी दिलेला आहे. आज मितीला आपण बोलत असताना माझ्या तालुक्यात २४० कोटींची कामे चालू आहेत. त्याचा हा पुरावा मी तुमच्यासमोर अधिकृत समोर ठेवतोय ! तो तुम्ही पुन्हा निट वाचून बघा. आणि हजार कोटी, एक हजार पन्नास कोटीची कामं मी मंत्रालयात मंत्रीमहोदयांच्या प्रस्ताव सादर करण्याच्या सह्या घेवून मागितलेला आहे.   सर्व काम माझी जनहिताची जनतेच्या गरजेची आणि शेतकऱ्याच्या प्रपंचाशी निगडीत असल्यामुळे मला खात्री आहे, येणाऱ्या तीन चार महिन्यात माझी सर्व कामं मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबमंजूर करणार आहेत. मी .. एवढं मला दिलं असताना मी शिवसेनेवर  नाराज्र असं चित्र उभं करणं, हा मी एक नतद्रष्ट माणूस आहे असं चित्र उभा कृपा करून कुणी  करू नये.    

शिवसेना हा माझा राजकीय पक्ष म्हणून मी निवडलेला पक्ष नाही. तर शिवसेना ही मी भावनिक नात्याने निवडलेला पक्ष आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या अंत्ययात्रेत मी माझ्या धर्मपत्नीला टीव्हीच्या समोर वचन दिलं होतं. की येणारी निवडणूक मी शिवसेनेकडून च लढवणार आणि त्या वचन पूर्तीसाठी मी १३ साली स्वत: होऊन उद्धवजी ठाकरे साहेबाना सेना भवनाला एकटाच भेटलो आणि त्यांना विनंती केली की मला तुम्ही शिवसेनेत घ्या ! ही काँग्रेसवरची आजीबात माझी नाराजी नव्हती तर हे हिंदू हृदयसम्राट यांच्यावरच माझ अतोनात बालपणापासूनच असलेलं प्रेम या नात्यातून ही  माझी भावना तयार झाली आणि मला व्यक्तिश: मी ९५ ते ९९ आमदार असताना एक प्रसंग मातोश्रीवर जाण्याचा माझ्या मित्राबरोबर आला होता. त्यावेळी उद्धवजी ठाकरे साहेबांचा सहवास मिळाला. त्यांनी मला काही वाघांचे काढलेले फोटो बसून आम्हाला, रावते साहेबाना दाखवले. त्यावेळी त्यांचा एकूण स्वभाव पाहिल्यानंतर उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला संधी मिळेल त्याचाही मला मोठा आनंद होता. आज उद्धव साहेबांनी मला भरभरून निधी दिलेला आहे, व्यक्तिश: त्यांचे माझ्यावर लक्ष आहे. माझ्यावर आणि संपूर्ण माझ्या कुटुंबावर त्याचं प्रेम आहे. त्यामुळे मी नाराज असायचा कोणताही आणि कसलाही मुद्दा नाही, कुणीही असे गैरसमज पसरवू नये. 


मी रणजीत दादा निंबाळकर यांना ' तुम्हाला मंत्रीपद मिळावं' अशा शुभेच्छा दिल्या . आणि विनोदानं तुम्हाला जुळत नसलं तर आम्हालाही घेऊन जावा, आम्ही नितीन गडकरी यांना सांगू, आमच्या मतदार संघातील हा तरुण खासदार मंत्री करा !"    


आमदार शहाजी बापू पाटील हे तसे चाणाक्ष, उच्चशिक्षित आमदार आहेत त्यामूळे त्यांच्याकडून अशी विधाने होतील यावर विश्वास बसण्यासारखी बाब नाही. त्यांची वक्तृत्व प्रचंड ताकदीचे आहे त्यामुळे बोलण्याच्या ओघात ते काही बोलून गेले असे देखील कुणी म्हणणार नाही. राजकारणात अशा घटना घडतही असतात. आता या विषयावर पडदा पडणे हेच शिवसेना आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी आवश्यक ठरणार आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !