उस्मानाबाद : राज्यात शिवसेनेचे कार्याध्यक्ष असणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असताना येथील एका जेष्ठ आणि एकनिष्ठ शिवसैनिकाने शिवसेनेच्याच भगव्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुख:दायक आणि धक्कादायक घटना घडली आहे.
शिवसेनेची सत्ता जेंव्हा येते तेंव्हा सतरंजी उचलणारे, घोषणा देणारे बाजूला पडतात असा पहल्या सत्तेपासून अनुभव आहे. कुठल्याही राजकीय पक्षात असेच घडते पण शिवसेनेत अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत आणि हे शिवसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेले आहेत. राजकारण म्हटलं की निष्ठावान आणि गद्दार अशी सगळीच भेळमिसळ असते पण सच्चा शिवसैनिक अखेरपर्यंत भगवा सोडत नाही अशी अनेक उदाहरणे आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील अशाच एका निष्ठावंत शिवसैनिकाने भगव्याने गळा आवळून आपल्या जीवनच अखेर केली. उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवलेल्या दत्तात्रय नारायण वऱ्हाडे या ६५ वर्षे वयाच्या शिवसैनिकाने आपल्या घराशेजारील झाडाला भगव्याच्याच सहाय्याने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे.
दत्तात्रय वऱ्हाडे यांनी १९८४ साली उस्मानाबाद शहरात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली होती आणि तेंव्हापासून खांद्यावर घेतलेला शिवसेनाचा भगवा त्यांनी कधीच खाली ठेवला नाही. शिवसेनाप्रमुखांना दैवत मानून त्याने शिवसेनेची पूजा बांधली. चहाची टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करणारे दत्तात्रय निवडणूक आली की टपरी बंद करून प्रचारासाठी पायपीट करायचे. आर्थिक अडचणीत असतानाही मैलोनमैल पायी आणि सायकलवरून पायपीट करीत शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करीत फिरायचे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निस्सीम भक्त म्हणून त्यांची ओळख होती, त्यातूनच त्यांनी लोकांकडून उसनवारीने पैसे घेऊन शिवसेनेची पहिली शाखा उस्मानाबाद येथे स्थापन केली होती . गेल्या ३५ वर्षात उसमानाबाद जिल्ह्यातून शिवसेनेचे चार खासदार आणि सहा आमदार निवडून आले, ३५ वर्षापासून शिवसेनेसाठी पायपीट करणारा हा कार्यकर्ता मात्र अखेरपर्यंत पत्र्याच्या घरात राहिला.
शिवसेनेच्या जीवावर अनेकजन आमदार, खासदार झाले, वेगवेगळ्या पदावर गेले आणि यातील काही जण फायदा संपला की सेनेपासून दूर जाऊन गद्दार म्हणून परिचयाला आले. मोडकी तोडकी सायकल जवळ नसलेले मोठमोठ्या गाड्यात फिरू लागले आणि राहायला झोपडे नसलेले अलिशान बंगल्यात राहू लागले. अनेक निष्ठावान शिवसैनिक मात्र कायम दोन वेळच्या जेवणालाही महाग होते आणि ते महागच राहिले. प्रलोभने आली तरी त्यांनी खांद्यावरच भगवा खाली ठेवला नाही. अशा निष्ठावान शिवसैनिकातील एक सैनिक दत्तात्रय वऱ्हाडे होते. या जेष्ठ शिवसैनिकाने आर्थिक अडचणीतून आपले जीवन संपवले. आयुष्यभर खांद्यावर शिवसेनेचा भगवा घातला आणि आयुष्याची अखेर करतानाही त्याने भगवाच गळ्याला बांधला. त्यांच्या अशा जाण्याने केवळ शिवसेनेतच नव्हे तर राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यानाही वेदना झाल्या. गळ्याला भगवा बांधून या शिवसैनिकाने या जगालाच अखेरचा जय महाराष्ट्र केले !
वाचा > पोलिसानेच केला वकील महिलेवर बलात्कार !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !