BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ जाने, २०२२

ओमीक्रॉन वेगवान, कोरोना रुग्णात पाचपटीने वाढ !

 




नवी दिल्ली : भारतात ओमीक्रॉन सुसाट वेगाने सुटलेला असून देशात एका आठवड्यात कोरोना बाधितांची संख्या पाच पटीने वाढली आहे त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्याची वेळ आली असून अधिक दक्षता घेण्यातही गरज निर्माण झाली आहे


तिसरी लाट येणारच नाही असा अंदाज काही अभ्यासक करीत होते पण आता जगासह भारतातील वास्तव काही वेगळेच दिसू लागले असून ओमीक्रॉन व्हेरिएंट अत्यंत वेगाने पसरत आहे आणि पुन्हा एकदा हे नवे संकट समोर उभे राहिलेले आहे. क्वचित कुठेतरी सापडणारा ओमीक्रॉन आता देशात आणि राज्याच्याही विविध भागात आपले आस्तित्व दाखवत निघाला आहे. देशभरात कोरोना संसगाने वेग घेतला असून तो झपाट्याने वाढताना दिसत आहे. एका आठवड्यात रुग्णांची संख्या पाच पटीने वाढली असल्याने येत्या काही दिवसांत तर उद्रेक झालेला दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.  डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांची सरासरी संख्या दर दिवशी साडे सहा हजार एवढी होती पण  आता तीच संख्या ३३ हजार ७५० वर पोहोचली आहे. पाच पटीने वाढ होत असल्याचे रोजचे आकडेच सांगू लागले आहेत. जवळपास गेल्या चार महिन्यातील ही सर्वाधिक संख्या आहे. 


२६ डिसेंबर रोजी ६ हजार ५३१ रुग्ण देशात होते त्यात आठवड्यात पाच पटीने वाढ होऊन ही संख्या ३३ हजाराच्या पुढे गेली आहे.  मागील २४ तासात १२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशात १ लाख ४५ हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत देशात ३ कोटी ४२ लाख ९५ हजार ४०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर ४ लाख ८१ हजार ८९३ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.  दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढती असून अडीच महिन्यात सर्वाधिक वाढ काल आढळून आली आहे. कोरोना वाढीचा वेग प्रचंड आणि चिंताजनक आहे. या वेगामुळे येत्या काही दिवसातील बाधितांची संख्या धक्कादायक ठरण्याची शक्यता आहे. ओमीक्रॉन हा डेल्टापेक्षा अधिक वेगाने पसरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने या आधीच म्हटलेले आहे. भारतात २७ डिसेंबर ते २ जानेवारी या एकाच आठवड्यात १ लाख ३० हजार बाधित समोर आले असून तीन महिन्यातील हे सर्वाधिक संख्या आहे. अशाच पद्धतीने कोरोनाच प्रादुर्भाव वाढत चालल्याचे समोर येत आहे.   


राज्यात कोरोनाची स्फोटक परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. गेल्या २४ तासात राज्यात ११ हजार ८७७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही महिन्यातील ही सर्वाधिक संख्या असून  ओमीक्रॉन देखील झोप उडवताना दिसू लागला आहे. राज्यात काल एका दिवसात ओमीक्रॉनचे ५० नवे रुग्ण आढळले असून राज्यातील ओमीक्रॉन बाधितांची संख्या आता ५१० झाली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार काल आढळलेल्या ५० रुग्णात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. पुणे ग्रामीण - २, पिंपरी चिंचवड - ८, तर पुणे महानगरपालिका क्षेत्रातील २८ रुग्ण आहेत. सांगली येथे २ आणि मुंबई, ठाणे येथे प्रत्येकी एका रुग्णाचाही यात समावेश आहे.  


राज्यात कोरोना गुणाकाराच्या पद्धतीने वाढू लागला आहे, शनिवारी एकाच दिवसात राज्यात ९ हजार १७० नवे रुग्ण आढळले आहेत  तर दुसऱ्याच दिवशी रविवारी राज्यात ११ हजार ८७७ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतील वाढ तर अधिक आणि वेगाने होताना दिसून आली आहे. कोरोना गुणाकार करू लागल्याने ही बाब अधिक चिंतेची मानली जात आहे.  

सांगलीत दोन रुग्ण 

सांगली येथील पती पत्नी यांना ओमीक्रॉन ची बाधा झाल्याचे समोर आले. या दोघांचा अहवाल ओमीक्रॉन बाधित म्हणून आला असून त्यांनी कोणताही प्रदेश प्रवास केला नाही तसेच त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घातलेले आहेत. त्यांना लक्षणे जाणवू लागल्यामुळे तपासणी केली असता ओमीक्रॉन आढळून आला आहे. या दोन रुग्णांमुळे सांगली आरोग्य प्रशासन एकदम सतर्क झाले असून आता अधिक काळजी घेतली जात आहे. या दोन्ही रुग्णांना काही त्रास नाही पण त्यांना ही बाधा कोणत्या माध्यमातून झाली हे मात्र समजू शकले नाही. आरोग्य विभाग आता त्याचाही शोध घेत आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !