सोलापूर : कोरोनाची तिसरी लाट आली असली तरी शासनाने राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला आहे पण सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरु होण्याची शक्यता धूसर असल्याचे संकेत मिळत आहेत.
कोरोनाचे रुग्ण राज्यात सगळीकडेच वाढत असून कोरोनाचा आलेख चढता आहे. शासन एकेक निर्बंध लागू करीत असताना मात्र राज्यातील शाळा सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय वादात सापडला असल्याचेही दिसत आहे, राजकीय विरोधकांनी नेहमीप्रमाणे या निर्णयावर टीका केली असली तरी ती 'राजकीय' आहे याची सर्वांनाच जाणीव आहे आणि केवळ टीका करण्याचेच काम केले जाते त्यामुळे त्याकडे कुणी गंभीरपणे पहिले नसले तरी जनमानसात या निर्णयाचे आश्चर्य मात्र व्यक्त होत आहे. काही पालक आणि विद्यार्थी शाळा सुरु करण्याची मागणी करीत असले तरी कोरोनाची परिस्थिती शाळा सुरु करण्यायोग्य नाही हे दिसत आहे. त्यामुळे या निर्णयावर पालक आणि विद्यार्थी संभ्रमित झाले आहेत.
राज्य शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर टाकली आहे. सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता कोरोनाचे नवे रुग्ण रोज वाढत्या आकड्याने आढळून येत आहेत त्यामुळे स्थानिक प्रशासन गंभीर आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरु करण्याचा निर्णय प्रशासन घेण्याची शक्यता दिसत नाही. सोलापूर जिल्ह्यातील १ हजार ८७ माध्यमिक शाळा आणि सुमारे तीन हजार प्राथमिक आणि खाजगी शाळा सुरु करण्याबाबत जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सदर केला आहे परंतु जिल्हाधिकारी यांनी याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. सोलापूर महानगरपालिकेने मात्र शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय आठ दिवसांनी घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे, त्यामुळे सोलापूर शहरातील शाळा अजून आठवडाभर तरी सुरु होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण बाबत देखील असाच निर्णय येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी जबाबदारी मात्र स्थानिक प्रशासनावर टाकली आहे आणि सोलापूर जिल्ह्यात कोरोना वाढत असून लाखो लोकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाही. कोरोना प्रतीबंधात्मक नियम लोक बेदखल करताना दिसतात. अशा परिस्थितीत प्रशासकीय अधिकारी शाळा सुरु करण्याच्या मानसिकतेत नक्कीच असणार नाहीत. शाळा सुरु केल्या तरी अशा घातक परिस्थितीत पालक मुलांना शाळेत पाठविण्याची शक्यताही कमी आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकूण परिस्थिती पाहिली तर शाळा लगेच सुरु होतील असे चित्र दिसत नाही त्यामुळे ही शक्यता आता धूसर होत चालली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !