BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जाने, २०२२

लसीमुळे मुलीचा मृत्यू, मुंबई मनपाच्या महापौर म्हणाल्या --





मुंबई : कोरोनाची लस घेतल्यामुळे घाटकोपर येथील पंधरा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याच्या कथित घटनेने वावटळ उठले असताना, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केले असून हा मृत्यू लस घेतल्यामुळे झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. 


शासनाने कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या असून त्यातील लसीकरण हा महत्वाचा उपाय आहे. तिसरी लाट आली असून या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे संतिले गेल्यावर शासनाने तातडीने पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचे लसीकरण वेगाने सुरु केले. काही भागात मुलांच्या लसीकरण चांगले झाले आहे तर काही भागात अजूनही ही टक्केवारी कमी आहे. दरम्यान एम्बीबीएस असलेले डॉक्टर तरुण कोठारी यांनी घाटकोपर येथील पंधरा वर्षे वयाच्या मुलीचा कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.  एका डॉक्टरांनीच हा आरोप केल्याने त्याला वेगळे महत्व नक्कीच आहे पण जर हे सत्य नसेल तर लसीकरणापासून नागरिक दुरावण्याचा मोठा धोका आहे.


कोरोना लस आल्यापासून अनेकांनी अनेक प्रकारचे गैरसमज झाले आणि काहींनी कसलाही पुरावा नसताना लसीबाबत मोठमोठी विधानही केली आहेत. शासन आणि प्रशासन लसीकरणासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे, तिसरी लाट आली असून तिचा सामना करण्यासाठी लसीकरण आवश्यक असल्याचे तज्ञ सांगत आहेत. आजही गैरसमज आणि भीतीपोटी असंख्य नागरिकांनी लस घेतलेली नाही. कोरोनाची तिसरी लाट आल्याने शासन सतर्क असताना आणि लसीकरणाचे आवाहन केले जात असताना एक एमबीबीएस डॉक्टरांनीच अशा प्रकारचे विधान केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. 


डॉ. तरुण कोठारी यांनी लस घेतल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा केल्यानंतर खळबळ उडणे स्वाभाविक आहे आणि तशी खळबळ उडालीही आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने याबाबत काही सांगणे आवश्यक होते परंतु मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मृत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे आणि वस्तुस्थिती जाणून घेतली. कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला आहे. सदर मुलीचा मृत्यू लसीकारणामुळे झाला नसल्याचे महापौर पेडणेकर यांनी सांगितले आहे. त्यांनी हे विधान कशाचा आधारे केले हे मात्र समजू शकले नाही.  'वडिलांच्या मांडीवर त्या मुलीने जीव सोडला हे प्रचंड धक्कादायक आहे. अशा वेळी त्यांना धीर द्यायचा सोडून त्यामागे राजकारण करून मग लहान मुलांनी लसीकरण करूच नये, असा जो कुणाचा हेतू आहे तो किती घात आहे याचा अंदाज येत आहे. लहान मुलांच्या जीवाशी तुम्ही राजकारण करणार का ?' असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.  


डॉ. तरुण कोठारी यांनी मुलीच्या मृत्यूचा हा आरोप केला आहे पण वस्तुस्थिती काय आहे हे देखील समोर येणे आवश्यक आहे. डॉक्टर कोठारी यांनी केलेला हा आरोप कशाच्या आधारे आहे ? याची चौकशी तर व्हायलाच हवी परंतु  महापौर पेडणेकर यांनी केलेला दावा कुठल्या तथ्यांच्या आधारे केला आहे हे देखील समोर येणे आवश्यक आहे. हा विषय अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्यामुळे सहजपणे घेऊन 'विरोधकांचे राजकारण' एवढ्यावर दुर्लक्षित करण्यासारखे नक्कीच नाही.  एवढ्या संवेदनशील घटनेवर कुणीच राजकारण न करता मूळ विषयाला धरून चौकशी होणे आणि निष्कर्ष जनतेपर्यंत येणे यालाच महत्व देण्याची आवश्यकता आहे. 


चौकशीत जर जाणीवपूर्वक कुणी दुषित हेतूने ही अफवा जन्माला घातली असेल तर त्याच्यावर कारवाई करून जनतेला विश्वास मिळणे गरजेचे आहे. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट फोफावतेय. शासन आणि प्रशासन जीवापाड परिश्रम घेत आहे आणि लसीकरण शंभर टक्के कसे होईल यासाठी कष्ट घेत आहे. अशा वेळी असामाजिक घटनांना आधार न मिळण्यासाठी तातडीने एकूण प्रकरणाची सर्वांगाने चौकशी होणे हेच सर्वाधिक महत्वाचे आहे. येथे कुणाच्याही राजकीय स्टेटमेंटला महत्व देण्याची गरज आणि वेळाही नाही हे गंभीरपणे घेतले गेले पाहिजे.  


घाटकोपर येथील मुलीचा मृत्यू झाला आहे ही घटना तर सत्य आहे मग तो नेमका कशामुळे झाला? लस घेतल्याने झाला नसेल तर मग दुसरे कुठले कारण होते ? लसीमुळे मृत्यू झाला नाही हे सांगितले जात असेल तर मग कशामुळे झाला आहे हे देखील सांगायला हवे होते.  सदर मुलीच्या पालकांचे काय म्हणणे आहे ? पालकांनी पुढे येण्याऐवजी डॉक्टर तरुण कोठारी यांनी या घटनेला तोंड कसे फोडले ? या आणि अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राला मिळणे अत्यावश्यक बनले आहे. 

अपडेट 

सदर मुलीचा मृत्यू हा कार्डीयक अरेस्टमुळे असून लसीचा काही संबंध नसल्याचे मुंबई महापालिकेने अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !