BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ जाने, २०२२

थंडीचा कडाका आणखी वाढणार !

 




पुणे : कडाक्याच्या थंडीने अवघा महाराष्ट्र गारठून गेलेला असताना आणखी काही दिवस ही थंडी कायम राहणार असून येत्या काही दिवसात हा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


गेल्या काही वर्षात हवामानाचे चक्र बदलून गेले असून त्याने अभ्यासकानाही विचारात पाडले आहे. उन्हाळ्यात पाउस पडू लागला आहे तर हिवाळ्यात तपमान वाढत आहे. निसर्गाच्या ठरल्या वेळेत विपरीत घडू लागले असून आता मात्र हिवाळा अखेरच्या टप्प्यात असताना थंडीचा कडाका भलताच वाढला आहे. या अचानक वाढलेल्या थंडीमुळे अनेकांना अर्धांगवायूपासून अनेक प्रकारचे त्रासही होऊ लागले आहेत त्यामुळे या थंडीत थंडीपासून बचाव करण्याचे सगळे मार्ग आणि उपाय करावेत असे आवाहन केले जात आहे.  जानेवारी महिना थंडीचाच असतो पण गेल्या काही दिवसात या थंडीचा कडाका भलताच वाढला असून दिवसभरही तापमानात फारशी वाढ होत नाही. त्यामुळे रुग्ण आणि वृद्ध व्यक्ती यांना याचा खूपच त्रास जाणवू लागला असून कधी हा कडाका कमी होतोय याची प्रतीक्षा केली जात आहे. लोक थंडी कमी होण्याची वाट पाहत असले तरी हवामान विभागाने मात्र थंडी कायम राहून त्यात वाढ होणार असल्याचेच सांगितले आहे. 


मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात थंडी अधिक पडली असून राज्यात सर्वात अधिक थंडी जळगाव येथे आहे. येथील तापमान ११ अंश सेल्सियस एवढे नोंदले गेले आहे. त्यातच राज्यात कोरडे हवामान असल्यामुळे थंडी आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या दिशेने उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले आहेत, अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे देखील महाराष्ट्राच्याच दिशेने येत आहेत.  त्याचा परिणाम राज्यातील विविध भागातील तापमानावर होत आहे त्यातच आजपासून (१७ जानेवारी ) २० जानेवारी पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. सद्याची थंडी तर कायम राहणार आहेच पण येत्या काही दिवसात तापमान आणखी कमी होऊन थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. 


सोलापूरचे तापमान १५.५ अंश सेल्सियस एवढे नोंदले गेले आहे तर राज्यातील अन्य जिल्हेही असेच गारठले आहेत. महाबळेश्वर - ११.७ , सातारा- १३.१, सांगली - १४.८, कोल्हापूर - १६.३, परभणी १३.१, औरंगाबाद १२, नांदेड - १४.२, अकोला - १५.५, अमरावती १३.३. बुलढाणा- १२.५, चंद्रपूर १४.६, ब्रह्मपुरी - १४, नागपूर - १२.६, वाशीम -१३, वर्धा -  १२.६, मुंबई- २०.५, डहाणू - १६.६, रत्नागिरी- १९ अशा तापमानाची नोंद झाली असून हे तपमान आणखी खाली येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. २१ जानेवारीच्या नंतर मात्र थंडीचा हा कडाका काहीसा कमी होत जाणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !