चिपळूण : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आणि लसीकरण महत्वाचे ठरत असताना आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला असून अवघ्या पंधरा वर्षे वयाच्या मुलाला पंधरा मिनिटाच्या अंतराने लसीचे दोन डोस देण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी शासन कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचे सतत आवाहन करीत आहे. जीवघेण्या कोरोनाची लस शासन प्रयेकाला मोफत देत आहे आरोग्य कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. गेल्या दोन वर्षात आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रचंड कष्ट उपसले आहेत पण काही कर्मचारी मधूनच करीत असलेल्या गलथानपणामुळे त्यांच्या परिश्रमाला गालबोट लागत आहे. कोरोनाची लस घेताना चुकून एका व्यक्तीला एकाचवेळी दोनदा लस दिली गेल्याच्या काही घटना या आधीही समोर आल्या आहेत. एका आरोग्य सेविकेने तर सिरींजमध्ये लस न घालता सुई दंडात खुपसली असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. अशा काही घटना घडल्यानंतर तरी आरोग्य कर्मचारी लक्षपूर्वक लसीकरण करतील अशी अपेक्षा होती पण आता लहान मुलांच्या बाबतीत देखील असाच बेपर्वाईचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
कोरोना वाढू लागल्याने आणि लहान मुलांना धोका होण्याची शक्यता असल्याने शासनाने पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यास मान्यता दिली. लस मोफत असतानाही अद्याप असंख्य लोकांनी लसीचा पहिला डोस देखील घेतलेला नाही. लसीकरणाबाबत जनतेच्या मनात अजूनही अनेक गैरसमज आणि भीती आहे. त्यात आरोग्य कर्मचारी असा बिफिकीरपणा करू लागले तर ही भीती अधिकच वाढण्याचा धोका आहे. लहान मुलांच्या बाबतीत तर पालक अधिक जागरूक असतात पण त्यांच्या लसीकरणावर याचा प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. चिपळूण येथील एका पंधरा वर्षे वयाच्या मुलाला पंधरा मिनिटांच्या फरकाने कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस देण्यात आले आणि ही बाब समोर आली तेंव्हा एकाच खळबळ उडाली.
चिपळूण तालुक्यातील फुरूस आरोग्य केंद्रात ही धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार उघडकीस आला तेंव्हा संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. संबंधित मुलाच्या पालकाने तातडीने धाव घेत दोन डोस दिल्याबाबत विचारणा केली असता 'चुकून झाले' एवढेच उत्तर आरोग्य कर्मचाऱ्याने अत्यंत सहजतेने दिले. मुलाचे कुटुंब मात्र या प्रकाराने प्रचंड तणावाखाली आले होते. मोठी घटना असली तरी आरोग्य कर्मचारी स्थितप्रज्ञ होता. 'मुलाच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास कोण जबाबदार ?' असा सवालही मुलाच्या वडिलांनी केला पण आरोग्य कर्मचाऱ्याकडे त्याचे काही उत्तरही नव्हते आणि ते गंभीरही दिसत नव्हते. 'चुकून झाले' एवढेच उत्तर त्यांच्याजवळ होते.
लहान मुलाला एकावेळी दोन डोस दिल्याने अन्य पालकातही घबराट पसरली आणि या घटनेची जिल्हाभर चर्चा सुरु झाली. दरम्यान दोन डोस दिलेल्या मुलाला कामथे येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलाची प्रकृती स्थिर असून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली हा मुलगा रुग्णालयात आहे. लहान मुलाच्या बाबतीत अशी घटना घडल्यामुळे अन्य पालकही धास्तावलेले दिसत आहेत. मुलांचे लसीकरण व्हावे म्हणून शासन आणि प्रशासन गतिमान झाले असताना आरोग्य विभागातील कर्मचारी अशी बेपर्वाई करू लागले तर लसीकरणाचा वेग मंदावण्याचा धोका आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !