BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जाने, २०२२

सोन्याचा मोह नडला ! कोयत्याचा धाक दाखवून लुटले !

 



पंढरपूर : अर्ध्या किमतीतल्या सोन्याचा मोह नडला आणि कोयत्याच्या धाकाने जवळचेही गमाउन बसण्याची वेळ आल्याची घटना पंढरपूर तालुक्यात घडली आहे.


या जगात कुणीही कुणाला फुकट अथवा अर्ध्या किमतीत काही देत नसतं तरीही कुणी तशा बतावण्या केल्या की मोहामुळे माणूस सहज फसतो. अशा मोहातच अनेकांची रोज फसवणूक होत असे पण पंढरपूर तालुक्यात एक मोठीच घटना घडली असून लुटारुंच्या टोळीने सोन्याचा मोह दाखवत हातोहात लुटमार केल्याची घटना समोर आली आहे. वाखरी येथील अनिकेत पोरे यांनी याप्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या फिर्यादीनुसार अनिकेत पोरे हे ट्रॅक्टर शो रूम मध्ये कामास आहे वाखरी येथील राजशेखर कोरे आणि अनवली येथील रोहित खुणे हे अनिकेत याच्या परिचयाचे आहेत. 


काही दिवसांपूर्वीच अनिकेत, राजशेखर आणि रोहित हे पंढरपूर येथे असताना त्यांचे मित्र गणेश महाराज यांची भेट झाली होती. एका महिलेचा आपल्याला फोन येत असून अर्ध्या किमतीत सोने विकायला ती तयार आहे. दोन नंबरचे सोने असल्याने अर्ध्या किमतीत मिळत आहे, हे सोने घेणार काय ? अशी विचारणा या गणेश महाराजाने तिघांना केली. अर्ध्या किमतीत सोने मिळतेय म्हटल्यावर कुणालाही मोह हा होणारच आहे. अनिकेत, राजशेखर आणि रोहित या तिघांनाही या सोन्याचा मोह झाला. त्यांच्यासोबतच्या दोघांनी सोने खरेदी करायची तयारी दाखवली. यावेळी या गणेश महाराज याने सोन्याचा एका फोटोही दाखवला आणि ९३७३३०७९४३४ हा मोबाईल क्रमांक दिला. 


अर्ध्या किमतीत सोने मिळतेय म्हटल्यावर आणि फोन नंबर हातात आल्यावर लगेच पुढची हालचाल सुरु झाली. मिळालेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधला गेला . या फोनवरून एक महिला बोलू लागली. अर्ध्या किमतीत सोने  देण्याची तयारी दाखवत या महिलेने त्यांना करकंबजवळ भेटण्यास सांगितले. भेटीची तारीखही दिली. त्यानुसार हे चौघेही करकंब येथे पोहोचले . त्यावेळी मात्र त्या महिलेने टेंभुर्णी रस्त्यावर एका आडबाजूच्या ठिकाणी त्यांना नेण्यात आले. या महिलेने एक किलो सोने असल्याचे सांगत अंगठ्या आणि काही दागिने त्यांना दाखवले. 


एवढे सोने घेण्याएवढे पैसे चौघांकडे नव्हते त्यामुळे त्यांनी या महिलेला तसे सांगितले. आम्ही सद्या तेवढे पैसे आणले नाहीत त्यामुळे थोडेच सोने खरेदी करणार असल्याचे त्यांनी या महिलेला सांगितले. त्याचवेळी सोने विकण्यासाठी म्हणून आलेल्या पाच लोकांनी जवळ लपविलेल्या चाकू आणि अन्य गुप्तीसारखे शस्त्र बाहेर काढले आणि अनिकेत याच्या गळ्याला लावले. राजशेखर याच्या गळ्याला कोयता लावून 'सगळे पैसे काढा नाहीतर खल्लास करून टाकू ' अशी धमकी दिली. चौघांच्याही अंगावरील सोने आणि रोख रक्कम त्यांनी काढून घेतली आणि तेथून ते पसारही झाले.  सोने विकण्याच्या बहाण्याने फसवणूक आणि लूटमार करणाऱ्या त्या पाच जणांच्या विरोधात करकंब पोलिसात गुन्हा दाखल केला असून करकंब पोलीस अधिक तपास करीत आहेत. अर्ध्या किमतीच्या सोन्याचा मोह या चौघांनाही भलताच महागात पडला आहे.  


वाचा : क्लिक करा :> प्रणिताताई भालके गरजल्या, म्हणाल्या, '----'

     





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !