BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जाने, २०२२

पंढरपुरात भर दिवसा धूळफेक करून तरुणाची लूट !


 
पंढरपूर : शहरात आज भर दिवसा आणि स्टेशन रोड सारख्या गजबलेल्या भागात एका तरुणाची फसवणूक करून ६८ हजार रुपयांची लुट करण्यात आली असून आता चोरट्यांचे मनोधैर्य भलतेच वाढले असल्याचे दिसून आले. 


पंढरपूर शहर आणि तालुक्यात चोऱ्या, घरफोड्या काही नव्या नाहीत. शहराच्या विविध भागात चोर आपले हात साफ करीत आहेत. विविध मठ मंदिरापासून चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत सगळीकडे चोरांचा मुक्त वावर असतो . उपनगरी नागरिकांना तर रात्री  चोरट्यांच्या भीतीने सुखाची झोप देखील घेता येत नाही पण आता तर दिवसाढवळ्या डोळ्यादेखत लूट करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 


माहेध परदेशी नावाचा तरुण आज दुपारी स्टेशन रोडवरील बँक  ऑफ बडोदा येथे रक्कम जमा करण्यासाठी निघाला होता. पंढरपूर येथील एका कापड दुकानात माहेध नोकरी करत आहे. या दुकानाचे पैसे बँकेत भरण्यासाठी तो निघाला होता. यावेळी एका व्यक्तीने त्याला 'तुमचे पॆसे खाली पडलेत' असे सांगून हुलकावणी दिली. आपले पैसे खाली पडल्याचे ऐकून माहेध  विचलित झाले आणि त्यांचे लक्ष इकडे तिकडे गेले. त्यांना बेसावध करताच त्या अज्ञात चोरट्याने त्याच्या हातात असलेली पिशवी हिसकावत पोबारा केला. या पिशवीत ६८ हजार रुपयांची रक्कम होती. 


भर दिवसा हातातील रक्कम हिसडा मारून आणि डोळ्यादेखत घेऊन जाण्याचे धाडस या चोरट्याने केले. स्टेशन रोड हा सतत गजबजलेला आणि वर्दळ असलेला रस्ता आहे. अशा ठिकाणीही चोरी करण्याचे धाडस या चोरट्याने दाखवले आहे. यावरून चोरट्यांचे मनोधैर्य किती वाढले आहे हेच दिसून येत आहे. या घटनेने नागरिकही धास्तावलेले दिसत आहेत. खरेदीसाठी अथवा बँकेत रक्कम भरण्यासाठी जायचे तरी कसे ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. हातातील रक्कम चोरट्याने पळवून नेल्याने गरीब तरुण एका बाकड्यावर रडत बसला होता. जमलेल्या नागरिकांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला .        



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !