पंढरपूर : ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर जीवघेणे ठरत असतानाच पुन्हा एकदा पंढरपूर- सांगोला मार्गावर एक अपघात होऊन दोन जण जखमी झाले आहेत.
पंढरपूर -सांगोला रस्ता हा वाहतुकीसाठी प्रचंड धोकादायक झाला असून मृत्यूचा महामार्ग म्हणूनच याची ओळख निर्माण होऊ लागली आहे. गेल्या वर्षभरात या मार्गावर अनेक गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत चकाचक झालेल्या रस्त्यामुळे वाहनांच्या वेगावर कसली मर्यादा उरली नाही आणि ज्याला त्याला प्रचंड घाई झाली आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. उसाच्या ट्रॉलीला पिकअपने पाठीमागून जोरदार धडक देऊन आणखी एका अपघात कासेगावच्या हद्दीत घडला आहे. या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत.
परांडा तालुक्यातील लोणी येथील शेतकरी सुरेश जालिंदर शिंदे आणि पोपट सोपान गुगडे हे त्यांच्या शेतातील कांदा घेऊन कोल्हापूर बाजार समितीत विक्रीसाठी निघाले होते त्यासाठी त्यांनी बाळासाहेब भास्कर पाटील (लोणी) यांचा पिकअप भाड्याने घेतलेला होता. भरधाव वेगाने जात असताना कासेगाव हद्दीत उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन एक ट्रॅक्टर निघालेला होता. पिकअपने पाठीमागून जाऊन या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीला धडक दिली आणि हा अपघात झाला. या अपघातात सुरेश शिंदे आणि पोपट गुगडे हे दोन शेतकरी जखमी झाले असून पिकअप चालक बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेल्या शेतकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसात होणाऱ्या बहुतेक अपघात दुसरे वाहन हे ऊंस वाहतूक करणारा ट्रॅक्टर हमखास असतो, ट्रॅक्टरशी संबंधित अपघातांची संख्या कशामुळे वाढत आहे याचा कधी विचार होणे आवश्यक बनले आहे.
ऊस वाहतूक करणारे ट्रक्टर हे सतत धोक्याचे ठरत आहेत. रस्त्यावरून जाताना अत्यंत कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवली जातात त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाची त्याला माहितीही होत नाही आणि ती माहिती करून घेणे चालकाला आवश्यक वाटत नाही. एका ट्रॅक्टरला अनेक ट्रॉली लावल्या जातात आणि क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून अंत्यंत वेड्यावाकड्या आणि बेफिकीर पद्धतीने ट्रॅक्टर चालवले जातात. यामुळे नागरिकांच्या प्राणावर सतत मृत्यूची टांगती तलवार असते. साधे रिफ्लेक्टरही लावलेले नसतात आणि ही वाहने रस्त्यात कुठेही, कशीही उभी केली जातात . रात्रीच्या वेळी ही वाहने दिसत नसल्याने मागून येणारे वाहन सरळ या उभ्या वाहनांना धडकतात आणि अपघात होतात.
वाचा >> उजनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय !
भर रस्त्यावरून असे ट्रॅक्टर बिनधास्त धावत सुटतात. जड वाहनांना मनाई असलेल्या रस्त्यावरूनही ही वाहने धावत असतात. वाहतुकीच्या सगळ्या नियमन फाटा दिला जातो पण वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असतात. वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला तर या वाहतुकीला शिस्त लागू शकते आणि नागरिकांचे प्राण वाचू शकतात. वाहतूक पोलीस मात्र या वाहतुकीशी आपला काहीच संबंध नाही अशा रितीने या वाहतुकीकडे पाहत असतात. वरिष्ठ पातळीवरूनच या बाबीची दखल घेणे आवश्यक असून तर आणि तरच अपघाताचे प्रमाण कमी होऊन नागरिकांचे जीव वाचण्याची शक्यता आहे. अशा वाहनांमुळे होणारे अपघात आणि मृत्यूंची संख्या तुलनेने अधिक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !