सोलापूर: उजनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय अखेर झाला असून रब्बी हंगामासाठी एक आवर्तन सोडले जाणार आहे. 'शोध न्यूज' ने या आधीच उजनी धरणातून पाणी सोडले जाण्याची तारीख दिली होती.
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून पाणी सोडण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत होते आणि यावर्षी उजनी धरणात मुबलक पाणी असल्याने प्रशासनालाही अडचण निर्माण होणार नाही. रब्बी हंगामासाठी एक आवर्तन २८ जानेवारीपासून सोडण्याचा निर्णय आज सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
२५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२२ डाव्या आणि उजव्या कालव्यातून ८ टीएमसी पाणी तर भीमा - सीना जोड कालव्यातून दीड टीएमसी पाणी सोडण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी दिली आहे. पहिल्या आवर्तनात ६.६५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. या बैठकीत उन्हाळा हंगामाचे देखील नियोजन करण्यात आले आहे, त्यानुसार पहिल्या आवर्तनात १६.९० टीएमसी तर दुसऱ्या आवर्तनात १७.९० टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. यामध्ये नदी, कालवा, उपसा सिंचन, जोड कालवा यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता धुमाळ, सोलापूरचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक धीरज साळे यांच्यासह विविध विभागांचे कार्यकरी अभियंता उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !