पंढरपूर : पोष्ट खात्याच्या समृद्धी योजनेत भरलेले पैसे प्रत्यक्षात संबंधितांच्या खात्यावर जमा न होता ते डाकपालाच्याच खिशात गेल्याची मोठी भानगड पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे उघडकीस आली आहे.
केंद्र सरकार टपाल विभागामार्फत बचतीच्या अनेक योजना काढते आणि या योजनेत रक्कम गुंतविण्यास प्रवृत्त करीत असते. योजनेचा फायदा घेण्यासाठी आपल्या कष्टाचे पैसे योजनेत गुंतवत असतात पण अनेकदा हे पैसे भलतीकडे जातात आणि लवकर ते कळतही नाही असा प्रकार घडतो. पंढरपूर तालुक्यात सरकोली येथे असाच एक प्रकार घडला असून तो पाच वर्षानंतर उघडकीला आला आहे. पोस्टल कर्मचाऱ्यानेच सदर रकमेचा अपहार केल्याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगोला तालुक्यातील संगेवाडी येथील सलीम अमीर मुलाणी हे सरकोली येथील पोस्टाच्या शाखा कार्यालयात कार्यरत असताना हा अपहार झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सरकोली परिसरातील अनेकांनी सुकन्या समृद्धी योजनेत आपल्या मुलींच्या नावे रक्कम ठेवली आहे. सन २०१६ मध्ये सरकोली येथील महेशकुमार चंद्रकांत भोसले हे आपले सुकन्या योजनेचे पुस्तक पंढरपूर येथील मुख्य पोष्ट कार्यालयात जमा करण्यासाठी आले असता त्यांच्या खात्यातील रक्कम कमी असल्याचे आढळून आले. याबाबत तत्कालीन पोष्ट मास्तर चराटे यांनी हा प्रकार लेखी स्वरुपात वरिष्ठ कार्यालाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर या प्रकरणी सखोल चौकशी झाली आणि अनेक लोकांनी भरलेले पैसे त्यांच्या खात्यावर प्रत्यक्षात जमा नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.
सुकन्या समृद्धी योजनेत जमा करण्यासाठी अनेक लोकांनी समीर मुलांनी याच्याकडे रक्कम दिली. मुलाणी याने ही रक्कम स्वीकारून संबंधितांच्या पासबुकात तशा नोंदी करून पोष्टाचा शिक्का मारून पुस्तके संबंधिताना परत दिली होती. रक्कम जमा केल्याबद्धल पासबुकावर सही देखील करण्यात आली. यामुळे कुणाला काही शंका येण्याचा विषय आलाच नाही. प्रत्यक्षात मात्र ही रक्कम पोष्टाकडे जमाच करण्यात आली नाही. त्याची कसलीच नोंद टपाल कार्यालयाच्या दप्तरी करण्यात आली नाही आणि ही रक्कम मुलांनी याने आपल्या खिशात घातली. सदर प्रकरणाच्या चौकशी दरम्यान मुलांनी याने या अपहाराची कबुली दिली आणि यापोटी त्याने ५५ हजार १४० रुपयांची रक्कम पोष्टाकडे किरकोळ खाती जमाही केली आहे. याबाबतची फिर्याद सहाय्यक अधीक्षक यांनी पोलिसांकडे केली आणि पोलिसांनी मुलांणी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !