BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ डिसें, २०२१

विठ्ठल साखर कारखान्याच्या जप्तीचा आज होणार अंतिम फैसला !

 



पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीबाबत आज पुण्यात अंतिम फैसला होणार असून कारखान्यावरील जप्ती टळण्याची अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे. 


पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना प्रचंड अडचणीत आला आहे. विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आणि आमदार भारतनाना भालके यांचे अकाली निधन झाल्यापासून या साखर कारखान्याला उतरती कळा लागली आहे. शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून लौकिक असलेल्या कारखान्याला लागलेली घरघर शेतकरी बांधवासाठीही क्लेशकारक ठरत आहे. एफआरपीची थकीत रक्कम न दिल्याने उस उत्पादक नाराज आहेत. कारखाना सगळ्या बाजूने अडचणीत सापडलेला असतानाच राज्य सहकारी बँकेने जप्तीची अंतिम नोटीस दिली आहे त्यामुळे कारखान्याचा श्वास गुदमरून गेला आहे. 


राज्य सहकारी बँकेचे जवळपास ४०० कोटीचे कर्ज विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आहे. सदर थकीत कर्ज वसूल होत नसल्याने राज्य बँकेने आपली कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याची ही कारवाई असून कारखान्याला याबाबत अंतिम नोटीस बजावण्यात आलेली आहे. या नोटीसीनुसार प्रत्यक्ष जप्तीची कारवाई आज होणे अपेक्षित आहे. नोटीस आल्यापासून ही कारवाई टाळण्यासाठी अनेकांचे नेटाचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नाला काही प्रमाणात यश आले असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे कारवाई टाळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कर्जापैकी काही रक्कम भरण्याच्या अटीवर ही कारवाई स्थगित करण्याची तयारी राज्य सहकारी बँकेने दाखवली आहे. त्या अनुषंगाने आज राज्य सहकारी बँकेचे अधिकारी आणि संचालक यांच्यात पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत जप्तीच्या कारवाईबाबत अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे.  


ही बैठक होत असली तरी कर्जातील काही भाग भरल्याशिवाय राज्य सहकारी बँक कारवाई थांबविण्याची शक्यता नाही कर्जाचे व्याज आणि हप्ता अशी ६ कोटीची रक्कम थकलेली आहे, ती प्रथम भरली जावी अशी राज्य सहकारी बँकेचे म्हणणे आहे. त्यानुसार काही रक्कम भरली जाण्याची शक्यता आहे. ही रक्कम भरली तर जप्तीची कारवाई स्थगित होण्याची अधिक शक्यता आहे. यासाठी आजच्या या बैठकीस विशेष महत्व असून या बैठकीत नेमका काय निर्णय होतोय याकडे पंढरपूर तालुक्यातील शेतकरी आणि सभासदांचे बारकाईने लक्ष आहे. आजच्या या बैठकीतील निर्णयावर कारखान्याचे भवितव्य ठरणार आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !