BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ डिसें, २०२१

महिलेचे मुंडके कापून नेणारा 'तो' निघाला तिचाच पती !

 




रायगड : माथेरान येथील लॉजवर महिलेचे मुंडके कापून पसार झालेला नराधम दुसरा तिसरा कुणी नसून तो या महिलाच पतीच निघाला आहे. अत्यंत कौशल्याने तपास करीत पोलिसांनी त्याला चोवीस तासांत गजाआड केले आहे.

माथेरान येथील एका लॉजवर अंत्यंत अमानुष पद्धतीने महिलेचा खून करण्यात आला होता आणि तिचे शीर कापून तो नराधम पसार झाला होता. एवढेच नव्हे तर ओळख पटू नये म्हणून तिच्या अंगावरील सर्व कपडे काढून तो महिलेच्या मुंडक्यासह पळून गेला होता. सकाळी लॉजच्या कर्मचाऱ्याच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर पोलिसांनी येथे धाव घेतली होती. ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली होती शिवाय महिलेची ओळख पटू नये यासाठी त्याने सर्व ते प्रयत्न केले होते. लॉज बुक करताना या महिलेचे आणि तिच्यासोबत असलेल्या पुरुष पर्यटकांनी खोटी नावे सांगितली होती त्यामुळे ही हत्या करण्याच्या उद्देशानेच तो पुरुष या महिलेला घेऊन आला असण्याची शक्यता स्पष्ट होते. महिलेचे शीर कापून, तिच्या अंगावरील कपडे काढून घेऊन तर तो गेलाच पण महिलेची ओळख पटू नये म्हणून तिच्या हातावरील गोंदण देखील त्याने नष्ट केले होते. 

कसलाही धागादोरा उपलब्ध नसल्याने या हत्येचा तपास करणे पोलिसांसाठी एक आव्हान बनले होते. गुन्हेगार कितीही चलाख असला तरी काही ना काही पुरावा मागे ठेवून जातो. सदर लॉजच्या जवळच झुडुपात पोलिसांना एक छोटीशी  बॅग मिळाली होती आणि या बॅगेत गोरेगाव येथील पत्ता असलेली दवाखान्याची एक चिट्ठी मिळाली. तेवढ्यावरून पोलिसांनी या महिलेची ओळख पटवली. सदर महिला मुंबईच्या गोरेगाव येथील असून तिचे नाव पूनम पाल असल्याचे समोर आले आणि त्यानंतर पोलिसांनी हत्येच्या घटनेचा तपास वेगाने सुरु केला. 

सदर महिला बेपत्ता असल्याची खबर पूनम पाल यांच्या नातेवाईकांनी गोरेगाव पोलिसात दिलेली होतीच पण ही महिला आपल्या पतीला भेटण्यासाठी म्हणून गेल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी लॉजच्या सीसीटीव्ही फुटेजमधून या जोडप्यांचे फोटो मिळवलेले होतेच. पोलिसांच्या तपासात या महिलेसोबत लॉजवर आलेला पुरुष हा दुसरा तिसरा कुणी नसून या महिलेचा पतीच होता याची पोलिसांना खात्री पटली. त्यानुसार या महिलेच्या पतीचा तपास सुरु केला आणि अवघ्या चोवीस तासांच्या आत या नराधम पतीला पनवेल येथून अटक करण्यात आली. रामसिलोचन रामशिरोमणी पाल (वय ३०) असे या आरोपीचे नाव आहे. 

चारित्र्याच्या संशयातून पतीने ही हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळू लागली असून पोलीस त्या दृष्टीने तपास करू लागले आहेत. अवघ्या सात महिन्यापूर्वीच मयत पुनमचे लग्न या आरोपीसोबत झाले होते.  लग्नात आरोपीच्या कुटुंबाने साडे पाच लाख रुपये हुंडा घेतला होता तरीही सतत आणखी पैशाची मागणी केली जात होती. कुटुंबातील लोकांनी माथेरान येथे जाऊन या हत्येची पूर्वतयारी केली आणि त्यानंतर ठरलेल्या नियोजनाप्रमाणे पूनमची हत्या करण्यात आली असे मयत महिलेचा भाऊ रमेश पाल यांचे म्हणणे आहे. 

रायगड पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवून महिलेची ओळख पटवली आणि नराधमाच्या मुसक्याही आवळल्या.  सदर घटनेने रायगड जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे आणि घटनाक्रम, क्रूरता पाहून प्रत्येकजण हादरला आहे. कसलाही पुरावा मागे न ठेवता थंड डोक्याने आरोपीने हा खून केला पण पोलिसांनी अत्यंत वेगाने या हत्येचा छडा लावला. पोलिसांच्या या कामगिरीचे रायगड जिल्ह्यात प्रचंड कौतुक होत आहे.  

शीर फेकले दरीत !

आरोपीने आपल्याच पत्नीचे शीर कापून तिची ओळख पटू नये म्हणून ते दरीत फेकून दिले होते. रामसिलोचन याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आपला इंगा दाखवताच हा खून केला असल्याची कबुली दिली. लॉजपासून जवळच असलेल्या दरीत त्याने आपल्या पत्नीचे मुंडके फेकून दिले होते. पोलिसांनी या दरीत शोध घेतला असता सदर महिलेचे मुंडके पोलिसांना आढळून आले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !