BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ डिसें, २०२१

पोलिसाला मारहाण करून चोरी, परराज्यातून चोरट्यांना अटक

 



अकलूज : येथील पोलीस वसाहतीत घुसून पोलिसाला मारहाण करून मोठी चोरी करून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली आहे. 

अकलूज येथील वसंतविहार पोलीस वसाहतीत सप्टेंबर महिन्यात एका पोलिसाचा घरात शिरून चोरट्यांनी चोरी केली होती. यावेळी तीन लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज चोरांनी पोलिसाच्या डोळ्यादेखत चोरून नेला होता. सर्वसामान्य नागरिकांच्या घरात घुसून चोर चोरी करतात पण पोलीस वसाहतीत जाऊन पोलिसाच्या घरात चोरी करण्याचे धाडस चोरांनी दाखवले होते, एवढेच नव्हे तर पोलिसाला मारहाण करून चोरी करून चोर पसार झाले होते. या घटनेने चोरांचे वाढलेले मनोधैर्य दिसून आले होते आणि  या चोरीची चर्चाही झाली होती. 

अकलूजच्या वसंत विहार पोलीस वसाहतीत राहणारे पोलीस कर्मचारी अमोल बापूसाहेब मिरगणे हे मुळचे बार्शी येथील रहिवाशी आहेत. आपल्या कुटुंबासह ते पोलीस वसाहतीत रहात असताना गौरीच्या सणासाठी त्यांचे  कुटुंब आपल्या गावी गेले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कुलूप कोयंडा तोडून घरात प्रवेश केला पण नेमके याच वेळी तपास कामासाठी बाहेरगावी गेलेले पोलीस कर्मचारी मिरगणे घरी आले. आपल्याच घरात कुणीतरी आपले कपाट कटावणी लावून तोडत असल्याचे त्यांनी आपल्या डोळ्यांनी पहिले. तेवढ्यात चोरानीही त्यांच्याकडे पहिले आणि चोर पळून जाण्याऐवजी त्यांच्या अंगावर धाऊन आले. त्यांच्यावर कोयता उगारून पैसे, सोने कुठे आहे ते सांग नाहीतर तुला मारून टाकीन अशी धमकीही या चोरांनी दिली. दरम्यान कपाटातील पैसे आणि दागिने चोरांनी काढून घेतले. यावेळी पोलीस कर्मचारी आणि चोर यांच्यात जोरदार झटापट झाली. या झटापटीत अमोल मिरगणे किरकोळ जखमी झाले. याचाच फायदा उठवत चोरटे पसार झाले. 

पोलिसाशी झटापट करून चोरांनी सोन्याचे गंठण, नेकलेस, सोन्याची साखळी, अंगठ्या, नथ, कर्णफुले आणि रोख रक्कम असे ३ लाख ८९ हजार रुपये किमतीचा ऐवज डोळ्यादेखत चोरून नेला होता. अकलूज पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता पण सप्टेंबर महिन्यापासून चोरटे पोलिसांच्या हाती लागले नव्हते. अखेर त्यांना मध्य प्रदेशातून अटक करण्यात यश मिळाले आहे.  पोलीस या चोरट्यांची माहिती घेत असतना मध्यप्रदेशातील गडरावत येथील बिलां रेवासिंग अमलीयार उर्फ अलावा याने आणि त्याच्या साथीदाराने ही चोरी केल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली होती. त्याच्या हाताचे ठसे देखील पोलीस तपासात जुळले होते त्यामुळे पोलिसांनी त्याचे लोकेशन मिळवले आणि त्यानुसार पोलीस मध्य प्रदेशात जाऊन धडकले. 

मध्य प्रदेशातील त्याच्या गावी हा चोर पोलिसांना मिळून आला आणि पोलिसांनी अत्यंत कौशल्याने त्याच्या मुसक्या आवळल्या. स्थानिक पोलिसाच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई केली आणि आरोपीने या गुन्ह्याची कबुलीही दिली. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने चोरीतील २ लाख रुपये किमतीचे दागिने काढून दिले आहेत. चोरी करून चोर राज्याबाहेर गेला पण पोलिसांनी कौशल्याने तपास करून त्याला गजाआड केले आहे. त्याच्या अन्य साथीदाराचा शोध आता पोलीस घेत आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !