BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ डिसें, २०२१

कोरोनाची तिसरी लाट 'ओमीक्रॉन' ची ! आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान !


 

जालना :  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती कमी झालेली असतानाच 'ओमीक्रॉन' या नव्या विषाणूने झोप उडवली आहे, त्यातच कोरोनाची तिसरी लाट अमिक्रोनची असू शकेल असे विधान दस्तूरखुद्द राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीच केल्याने आता मात्र चिंतेचा विषय नक्की बनू लागला आहे. 

 

गेल्या दोन वर्षात कोरोनाने प्रचंड नुकसान केल्याने मानवजात हादरून गेलेली आहे. . कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याबाबत बरीच मतमतांतरे सुरु होती पण कोरोना परतू लागला आणि येऊ घातलेली तिसरी लाट आता येत नाही अशी आशा निर्माण झाली. कोरोना परतीच्या मार्गावर असल्याने जनजीवनही पुरवत होऊ लागल्याचे दिसत होते. कोरोनाने केलेल्या नुकसानीतून सावरायला अजून काही काळ लागणार होता तेवढ्यात 'ओमीक्रॉन' या नव्या विषाणूने घुसखोरी सुरु केली आहे. या नव्या विषाणूचा अद्याप नेमका अंदाज तज्ञांनाही आलेला नाही पण भीती मात्र अधिक पसरू लागली आहे. हा नवा विषाणू कोरोनाएवढा घटक नसल्याचे सांगितले जात असताना आणि महाराष्ट्राला अद्याप फारशी चिंता करण्याची गरज नाही असे सांगितले जात असताना आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या विधानामुळे चिंता व्यक्त करण्याची पाळी महाराष्ट्रावर आली आहे. 


'ओमीक्रॉन'चे रुग्ण देशात आढळले तेंव्हापासून आरोग्य विभाग सावध झालेला आहे पण हळूहळू या विषाणूचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. कर्नाटक राज्यात या विषाणूचे दोन रुग्ण आढळले, गुजराथ राज्यात आज पुन्हा एक रुग्ण आढळून आला आहे. गुजरात येथे जामनगर मध्ये आढळलेला हा रुग्ण झिम्बाब्वे येथून आलेला असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन राज्यात असे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्राची धास्ती वाढली असून या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत महत्वाचे विधान केले आहे. 'कर्नाटक राज्यात या विषाणूचा रुग्ण आढळला आणि त्याच्या संपर्कात आलेले आणखी काही रुग्ण सापडले आहेत त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. या परिस्थितीत काळजी घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे, काळजी न घेतल्यास कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रोनची असू शकेल' असे विधान टोपे यांनी केले आहे त्याबरोबरच 'ओमीक्रॉन' हा विषाणू धोकादायक नाही पण संसर्ग मात्र वेगाने वाढतो' असेही टोपे यांनी सांगितले आहे. 


कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु होताच देशात आणि राज्यातही कडक निर्बंध लावण्यात आले होते त्यामुळे जनतेत या निर्बंधाची भीती आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊन लावले तर जगणे कठीण होणार आहे पण  याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सद्या तरी दिलासा दिला आहे. राज्यात लगेच निर्बंध लागू करणे त्रासदायक आणि जाचक ठरेल, सद्या तरी अशा निर्बंधाची आवश्यकता नाही असे टोपे यांनी सांगितले आहे. आजच्या परिस्थितीत टोपे यांनी हे विधान केले असले तरी हा विषाणू किती त्रासदायक ठरतो आणि त्याचा संसर्ग किती वेगाने होतोय यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. नागरिकांनी वेळीच काळजी घेण्याची मात्र गरज निर्माण झाली आहे अन्यथा पुन्हा विनाशाचे दिवस समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


कायदे आणि नियम करूनही बेफिकीर लोक कोरोनाचे गांभीर्य जाणायला तयार नाहीत हे सर्वात अधिक धक्कादायक आहे. सामाजिक अंतर ठेवणे आणि चेहऱ्याला मास्क लावणे ही अत्यंत साधी सोपी आणि सहज बाब आहे पण तरीही याकडे दुर्लक्ष केले जाते. लोक शहाणे आणि सुसंस्कृत झाले असल्याचे सांगितले जाते पण बाजारातील चित्र पाहिल्यावर यावर विश्वास ठेवणे कठीण असते. गर्दीच्या ठिकाणी लोक अनावश्यक गर्दी तर करतातच पण मास्क लावण्याचीही तसदी घेतली जात नाही हे सगळीकडे पाहायला मिळते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड नुकसान करूनही लोकांनी यातून फारसा काही बोध घेतला आहे असे दिसत नाही. स्वतः नियम पाळायचे नाहीत आणि कोरोणाचा प्रादुर्भाव वाढला की शासनाला दोष द्यायचा ही एक सवय होऊन बसली आहे. शासनाने निर्बंध लादले की पुन्हा हीच मंडळी सरकारवर टीका करीत सुटलेले पाहायला मिळतात. आपणच नियमनाचा भंग करून साठीच्या रोगांचा प्रसार होण्यास मदत करायची आणि वर आपणच शासनाच्या नावाने शंख करायचा अशी पद्धत रूढ होताना दिसत आहे. प्रत्येक नागरिकांनी नियम पाळले तर साथीच्या रोगाचा प्रसार आपोआप आटोक्यात येईल पण प्रत्यक्षात असे घडताना दिसत नाही म्हणून मानवजातीवर अशा प्रकारचे नवे संकट चाल करून येत आहे.         

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !