BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ डिसें, २०२१

चार चाकीत आले आणि घर, मॉल लुटून गेले !

 



महूद : चार चाकी गाडीत आले, आधी एका घरात लुटमार केली आणि नंतर एका मॉलमध्ये घुसून तेलाचे डबे, साखर, तांदूळ असा मालही चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना सांगोला तालुक्यातील महूद येथे घडली आहे. 

पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथे एका शेतकऱ्याच्या डाळिंब बागेवर डल्ला मारणारा चोर कालच रंगेहात सापडला होता, आज मात्र चोरट्यांनी सोने, दागिने यासह किरणा मालही चोरून नेल्याची घटना समोर आली आहे आणि आता चोर कशाची चोरी करतील हे सांगता येणे कठीण झाले आहे. घरात शिरून चोऱ्या होतच आहेत, लोक झोपेत असताना तर चोरी केली जातेच पण लोक जागे झाले तरी त्यांना धमकावत चोरी केल्याच्या घटना घडत आहेत. महूद येथे एका घरातून सोन्याचे दागिने तर दुसऱ्या मॉलमधून अन्नधान्य असा पाच लाखाचा माल चोरून चोरटे पसार झाले आहेत. 

महूद येथील लवटे गल्लीतील एका घरात पहाटेच्या सुमारास चोरांनी हुशारी दाखवत मोठा हात मारला आहे. लवटे गल्लीत राहणारे रमेश कांबळे यांच्या घरात घुसून अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या चोरांनी चोरी करण्याआधी भलतीच हुशारीही दाखवली आहे. रमेश कांबळे यांच्या घराच्या आजूबाजूच्या घरांना आधी या चोरांनी बाहेरून कड्या लावल्या आणि नंतर घरात प्रवेश करीत चोरी केली. सोन्याचे गंठन, दोन अंगठ्या आणि रोख रक्कम घेऊन चोर पसार झाले. एवढा मोठा माल मिळाला पण तेवढ्यावर चोरांचे समाधान झाल्याचे दिसत नाही. त्यांनी पंढरपूर रोडवर आणखी एका ठिकाणी आपला प्रताप दाखवला. 

रमेश कांबळे यांच्या घरात अडीच लाखाची चोरी करून चोरते पंढरपूर रोडवर असलेल्या 'कुटुंब' या मॉलकडे गेले. या मॉलमधून तेलाचे डबे, साखर, तांदूळ असा किराणा माल चार चाकी वाहनात खच्चून भरला आणि  मगच तेथून पोबारा केला. मॉलच्या मागील बाजूस असलेल्या शटरचे कुलूप तोडून चोर आत घुसले आणि चोरी करून पसारही झाले. जाता जाता त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची किमती मशीनही चोरून नेली एकाच रात्री एकाच गावात चोरीच्या दोन घटना घडल्या असून जवळपास पाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेने महूद परिसरात खळबळ उडाली आहे.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !