मंगळवेढा : सद्या जिकडे तिकडे चोरांचाच बोलबाला असून चोर आता देवाच्या पैशावारही टपून बसलेले असल्याचे दिसत आहे. मंदिरातील दानपेटी फोडून तब्बल दोन लाख रुपयांची रक्कम चोरट्याने पळविण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवेढा तालुक्यात घडली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांनी सगळेच ताळतंत्र सोडले असल्याचे दिसत आहे. पंढरीत भाविकांच्या विश्रांतीच्या ठिकाणी शिरून भाविकांचे दागिने, रोकड पळविल्याची घटना अलीकडेच समोर आली आहे. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांचे कपडेही चोरटे पळवून नेत असतात . बाकी चोऱ्या आणि घरफोड्या हे तर नियमितपणे सुरूच आहे पण आता हे चोर देवालाही सोडायला तयार नाहीत हे देखील समोर आले आहे. मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथील महासिद्ध देवाच्या मंदिरात दानपेटीतून रक्कम चोरताना पुजाऱ्याने एका चोराला जागेवर पकडला पण पळून जाण्यात तो यशस्वी झाला.
डोणज येथील मंदिरात सायंकाळच्या वेळेस हा प्रकार घडला. महासिद्ध देवस्थान मंदिरातील दानपेटी फोडून दोन लाखाची रक्कम घेऊन चोरटा पसार झाला पण पुजाऱ्याच्या हुशारीने त्याचे सगळेच बिंग फुटले आहे. मंदिराचे पुजारी प्रकाश पुजारी यांनी याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश पुजारी हे गेल्या चार वर्षांपासून या मंदिरात पुजारी म्हणून काम पाहत आहेत. पुजारी हे नेहमीप्रमाणे सायंकाळी देवाची पूजा करून ७ वाजण्याच्या सुमारास बाहेर आले असता गावातील राजेंद्र केदार नावाची व्यक्ती मंदिरात कट्ट्यावर येऊन बसली होती. या व्यक्तीचा पूर्वेतिहास माहित असल्याने पुजाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मंदिर असल्यामुळे 'येथे का आला ? तेथे का बसला ? असे प्रश्न तर विचारता येत नाहीत पण प्रकाश पुजारी यांच्या डोक्यात वेगळाच 'प्रकाश' पडत होता. मंदिर बंद करून सायकली सात वाजण्याच्या सुमारास ते आपल्या घरी निघून गेले.
पुजारी हे घरी आले पण त्यांचे लक्ष मंदिराकडेच लागलेले होते, त्याच्या मनात अनेक शंका आणि संशय येत होता. मंदिरात पूजा करून घरी आले तरी त्यांचे सगळे लक्ष मंदिराकडे लागलेले होते. गावातील राजेंद्र केदार हा सायंकाळी येऊन मंदिराच्या कट्ट्यावर बसला होता आणि हा प्रकार त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हता की मनातील शंका कमी होत नव्हत्या. पुजारी यांनी परत मंदिराकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि ते वेगाने मंदिरात पोहोचले. मंदिरात येताच त्यांच्या मनातील शंका सत्य होताना त्यांना दिसल्या. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पुजारी मंदिरात पोहोचले आणि त्यांना मंदिराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत पाहायला मिळाले. मंदिराचा दरवाजाही उघडाच होता. त्यांनी मंदिराच्या आत जाऊन पहिले तर हा राजेंद्र केदार हा दानपेटी फोडून त्यातील रक्कम आपल्या बॅगेत भरीत असल्याचे दिसले. पुजारी मंदिर बंद करून गेले आहेत आणि आता सकाळशिवाय ते काही येणार नाहीत अशी त्याची अपेक्षा होती. शिवाय रात्री मंदिरात कुणी दर्शनालाही येणार नाही याची खात्री चोराला होती. त्यामुळे त्याने दानपेटी फोडून आरामात त्यातील नोटा आणि चिल्लर आपल्या बॅगेत भरणे सुरु केले होते पण पुजाऱ्यांची हुशारी या चोराला चकवा देऊन गेली होती.
समोरचा प्रकार पाहून प्रकाश पुजारी यांना धक्काच बसला. राजेंद्र केदार हा गावातीलच असल्याने पुजारी त्याला ओळखत होते, शिवाय त्याने मागे केलेल्या अशा काही घटनांची माहिती पुजाऱ्यास होती. पुजारी एकदम त्याच्यावर ओरडले आणि 'हे काय करतोस ?' असा सवाल प्रकाश पुजारी यांनी केला. अचानक पुजारी परत आल्याचे पाहून केदारचे धाबे दणाणले आणि ऐनवेळी काय करावे हे त्याला सुचले नाही. घाबरलेल्या अवस्थेत त्याने नोटांची बॅग घेऊन पळून जाण्याचा मार्ग निवडला आणि तो मंदिरातून धावत सुटला. पुजारी यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला. पुजारी यांनी ताबडतोब मंदिर समितीचे सचिव चन्नप्पा बिराजदार यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर प्रकाश पुजारी यांनी मंगळवेढा पोलिसात याबाबत फिर्याद दिली असून पोलिसांनी राजेंद्र गणपत केदार यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दानपेटीमधून दोन लाख रुपयांची चोरी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
वाचा : तिसरी लाट ! पुनः लागणार कडक निर्बंध !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !