मुंबई : लॉकडाऊन, संचारबंदी आणि विविध निर्बंधाने वैतागून गेलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा कडक निर्बंधांच्या उंबरठ्यावर उभा असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार अद्यापही टांगतीच आहे.
'ओमीक्रॉन' ने महाराष्ट्राची चिंता वाढवली असून काल एका दिवसात या रुग्णांची महाराष्ट्रात ८५ नव्या रुग्णांची भर पडली आहे त्यामुळे पाहता पाहता राज्यातील ओमीक्रॉन बाधितांची संख्या २५२ वर पोहोचली आहे.
कोरोनाने जगातील अनेक देश हादरून गेलेले आहेत. संपूर्ण भारत मागच्या दोन वर्षात या कोरोनामुळे मेटाकुटीला आला असून महाराष्ट्रात तर कोरोनाने गेल्या दोन वर्षात प्रचंड धुमाकूळ घातला आहे. आता कुठे कोरोन परतीच्या प्रवासाला लागल्याचे संकेत मिळत असतानाच ओमीक्रॉनची घुसखोरी झाली आणि पुन्हा चिंता करण्याची वेळ आली आहे. देशात सगळीकडेच ओमीक्रॉनचे रुग्ण आढळत असले तरी महाराष्ट्रातील संख्या उच्चांकी आहे त्यामुळे महाराष्ट्राला अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. एखादा दुसरा रुग्ण सापडल्याच्या बातम्या पोहोचत असताना ही वाढ झपाट्याने होत गेली आणि राज्यातील संख्या २५२ वर पोहोचली. विशेष म्हणजे काल एका दिवसातच ५३ नवे रुग्ण आढळून आले त्यामुळे भविष्यातील दोन महिने भलतेच कठीण असणार असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रात वेगाने वाढणारा ओमीक्रॉन मोठ्या शहराबरोबर आता राज्यात विविध भागात पोहोचू लागला आहे. राज्यात एका दिवसात आढळलेल्या ८५ रुग्णांच्यापैकी ५३ रुग्ण मुंबईतच आहेत. ८५ रुग्णातील ४७ रुग्णांचा अहवाल एनआयव्ही आणि ३८ रुग्णांचा अहवाल आयआयसईआर या संस्थेने दिले आहेत. राज्यातील एकूण रुग्णसंख्या २५२ झाली असून यात मुंबईतील १३७ रुग्ण आहेत. यातील समाधानकारक बाब म्हणजे २५२ पैकी ९९ रुग्णांनी ओमीक्रॉनवर मात केली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत ओमीक्रॉन पोहोचला आहे. पुणे जिल्ह्यात ओमीक्रॉनचा प्रादुर्भाव अधिक दिसून आला आहे. राज्यातील नव्या ८५ नव्या रुग्णात ९ रुग्ण पुणे जिल्हयात आढळून आले आहेत. यातील पुणे महापालिका क्षेत्रात दोन रुग्ण, पिंपरी चिंचवडमध्ये सहा तर पुणे ग्रामीण मध्ये एका असे हे ९ रुग्ण आहेत. काल आढळलेल्या रुग्णांसह पुणे जिल्हयातील एकूण रुग्णांची संख्या ५४ झाली आहे. पुणे महापालिका क्षेत्रात २५, पिंपरी महापालिका क्षेत्रात ११ तर पुणे ग्रामीण क्षेत्रात १८ रुग्णांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात २५२ रुग्ण आढळले असले तरी यात बाहेरून आलेल्या रुग्णांचा अधिक समावेश आहे. अन्य राज्यातून आलेले २६ रुग्ण आहेत. हे रुग्ण परदेशातून महाराष्ट्रात दाखल झाले होते. परदेशी असणारे ९ रुग्ण आहेत. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आत्तापर्यंत ८७९ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून यातील १७६ नमुन्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. राज्यात मुंबईपासून उस्मानाबादपर्यंत नवे रुग्ण आढळून येत असून ओमीक्रॉनचा प्रसार वेगाने होत असल्याचे आढळून आले आहे. मुंबईत १३७ तर पिंपरी चिंचवड येथे २५ रुग्ण आढळलेले आहेत. पुणे ग्रामीण - १८, पुणे शहर ११, ठाणे - ८, नवी मुंबई - ७, पनवेल - ७, कल्याण डोंबिवली - ७, नागपूर - ६, सातारा - ५, वसई विरार - ३, उस्मानाबाद - ५, औरंगाबाद - २ , नांदेड - २, बुलडाणा - २, भिवंडी - २, लातूर - १, अहमदनगर - १, अकोला - १, कोल्हापूर - १ मीरा भाईंदर - १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाच्या रुग्णातही पुन्हा झपाट्याने वाढ होत असून राज्यासाठी ही चिंतेची बाब आहे. शहरे कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असताना पुन्हा ठिकठिकाणी कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. नव्या विषाणूचा अभ्यास केला असता तो गुणाकाराच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. साहजिकच पुन्हा वेगवेगळे निर्बंध लागण्याची परिस्थितीत निर्माण होत असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील यावर भाष्य केले आहे. 'तिसरी लाट म्हणूनच सरकार याकडे पाहत आहे, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थितीत वेगळी असेल असे तज्ञांचे मत आहे त्यामुळे गरज पडली तर निर्बंध कडक केले जातील असे अजितदादा पवार यांनी म्हटले आहे. कोरोना रुग्णांची संख्या अशाच वेगाने वाढत राहिली तर आगामी दोन महिने मोठ्या संकटाचे असणार आहेत आणि शासनाला पुन्हा मागच्यासारखे निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते हे स्पष्ट आहे. रुग्ण वाढू लागले तर अनिच्छेने का होईना पण लॉकडाऊन, संचारबंदी यासारखे कठोर निर्णय शासनाला घ्यावेच लागणार आहेत.
वाचा : पंढरपूर तालुक्यात नराधम बापाचा लेकीवर वारंवार अत्याचार !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !