BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ डिसें, २०२१

क्रुरतेचा कळस ...महिलेचा खून तर केलाच पण मुंडके घेऊन पसार झाला !

 



रायगड : माथेरान येथील एका लॉजमध्ये क्रूरतेचा कळस पाहायला मिळाला असून एका महिलेचा खून तर केलाच पण तिचे मुंडकेही कापून सोबत घेतून गेला, एवढेच नव्हे तर, ओळख पटू नये म्हणून महिलेच्या अंगावरील कपडेही काढून घेऊन गेल्याची घटना उघडकीस आली आहे. 

समाजात अनेक क्रूर घटना घडतात पण ही घटना त्यापेक्षा काहीशी वेगळी आहे. ३० वर्षे वयाची एक महिला आणि तिचा साठीदार माथेरान येथील एका लॉजमध्ये उतरले होते. लॉजमध्ये येताना त्यांनी आपली ओळखपत्रही दिली नव्हती आणि ते बनावट नावाने येथे राहत होते. लॉज कर्मचारी सकाळच्या वेळेस रूम साफ करण्यासाठी म्हणून गेला तेंव्हा त्याला हे भयानक चित्र पाहायला मिळाले. खोलीतील कॉटच्या खाली महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत पडलेला होता आणि महिलेचे मुंडके गायब होते. हा सर्व प्रकार पाहून कर्मचारी हादरला आणि त्याने तातडीने लॉज व्यवस्थापकास ही खबर दिली. 

सदर महिलेसोबत या लॉजमध्ये राहत असलेला पुरुष सर्व समान घेऊन पसार झालेला होता, त्याने या महिलेचा खून तर केलाच पण महिलेचे मुंडकेही घेऊन तो पसार झाला. महिलेची ओळख पटू नये यासाठी महिलेच्या अंगावरील सर्व कपडे काढून ते सोबत घेऊन त्याने पळ काढला असल्याचे दिसून आले. या घटनेने माथेरान पोलीस हादरून गेले असून त्यांनी लगेच तपास सुरु केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महिला आणि तिच्यासोबत असलेल्या पुरुषाने मास्क लावलेला असल्याचे दिसून आले आहे. लॉजच्या रजिस्टरमध्ये त्यांनी या महिलेचे नाव रुबिना बेन आणि पुरुषाचे नाव अमजद खान असे लिहिले आहे परंतु ही नावे खोटी असल्याचे समोर आले आहे. 

मयत महिलेची ओळख पटू नये याची पुरेपूर खबरादारी आरोपीने घेतली परंतु पोलीस तपासात या महिलेची ओळख पटली असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर लॉजच्या जवळच पोलिसांना एक हॅन्डबॅग आढळून आली होती. तेवढ्यावरून पोलिसांनी महिलेची ओळख पटवली असून सदर महिला मुंबईच्या गोरेगाव येथील असल्याची माहिती मिळाली आहे. 

दरम्यान सदर महिला बेपत्ता झाल्याबाबत तिच्या कुटुंबीयांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली होती. घटनेचे गांभीर्य पाहून माथेरान पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला असून लॉज चालकाने ओळखपत्र न घेता त्यांना लॉजमध्ये खोली दिल्याने पोलीस तपासात मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आरोपी आणि महिलेच्या मुंडक्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथकांची निर्मिती केली असून या घटनेने माथेरान हादरले आहे. अत्यंत क्रूर आणि अमानुषपणे केलेली ही हत्या असून एकूण परिस्थितीवरून थंड डोक्याने हा खून केल्याचे दिसत आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !