माढा : विद्यालयात चित्रकलेचे रंग समजावून सांगणाऱ्या एका शिक्षकाविरुद्ध चक्क लोकांच्या वाहनातील पेट्रोल चोरी केल्याचा गुन्हा माढा पोलीस ठाण्यात दाखल झालाय !
भुरटे चोर रस्त्यावर लावलेल्या दुचाकीतील पेट्रोलची चोरी करतात हे सर्वश्रुत आहे पण दिवसा शाळेत चित्रकलेचे धडे देणारा शिक्षक रात्रेच्या वेळेस लोकांच्या दुचाकीतील पेट्रोल चोरी करीत असेल यावर कुणाचा विश्वास बसणार नाही पण दुर्दैवाने अशा चोरीसाठी एका शिक्षकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रस्त्यावर, दुकानांच्या समोर अथवा घराच्या अंगणात दुचाकी लावली तरी पेट्रोलची चोरी होते हे आपल्याला माहित आहे. अत्यंत भुरटे आणि नशेडी पोरं अशा प्रकारे पेट्रोलची चोरी करतात. भला मोठा पगार असलेला कुणीही अशी फालतुगिरी करणार नाहीच, त्यात शिक्षकी पेशातील माणूस तर अशा भानगडी मुळीच करणार नाही. शिक्षक हा तर नवी पिढी घडविण्याची जबाबदारी घेतलेला जबाबदार नागरिक असतो. खोटे बोलू नये, चोऱ्या करू नये असं शिक्षण देत असतो. पण दुर्दैवाने शिक्षकावरच पेट्रोल चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मोहोळ येथील एका नामांकित विद्यालयात कलाशिक्षक म्हणून सेवा बजावणारा हा शिक्षक पहाटेच्या वेळेस दुसऱ्यांच्या दुचाकीतील पेट्रोल काढताना रंगेहात पकडल्याची तक्रार आण्णाराव नागनाथ खंडागळे यांनी माढा पोलिसात दिली आहे आणि त्यानुसार या शिक्षकावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. सन्मतीनगर भागात रात्रीच्या वेळेस दुचाकीतून पेट्रोल चोरी होण्याच्या घटना सतत घडत होत्या. या प्रकारामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रात्री उभ्या केलेल्या गाडीतील पेट्रोल सकाळी गायब झालेले असायचे. ज्यांच्या लक्षात हे यायचे नाही त्यांची गाडी मध्येच कुठेतरी बंद पडायची आणि मग त्यांना आपली गाडी ढकलत पेट्रोल पंप गाठावा लागायचा. अनेकांना अशा प्रकारचा त्रास झाल्यानंतर गाडीतील पेट्रोल रात्रीच्या वेळेस कुणीतरी काढून घेत असल्याचा संशय सर्वांनाच आला पण हा पेट्रोल चोर कोण आहे याचा मात्र पत्ता लागत नव्हता.
चोरी हा असा प्रकार आहे की तो कधी ना कधी समोर येतोच. येथेही असेच घडले आणि मोठा पगार मिळवणारा चित्रकला शिक्षक हाच पेट्रोलची चोरी करतोय हे समोर आले. आण्णाराव खंडागळे, लक्ष्मण पाटेकर, राहुल नरखेडकर, बापू पाटेकर आदींच्या घरासमोर लावलेल्या गाड्यातून पेट्रोल चोरी करून घेऊन जात असताना काही जणांनी या मास्तर ला रंगेहात पकडले. एक शिक्षकी पेशातील व्यक्ती पेट्रोल चोरी करतोय हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. चोरी रंगेहात पकडल्यामुळे लोकांनी त्याला सोडून न देता त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या शिक्षकाने चोरीच्या गुन्ह्याची कबुलीही दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. शिक्षकच चोर निघाल्याने परिसरात याची चर्चा असून शिक्षकी पेशाला काळे फासण्याचाच हा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
हे वाचाच : >> अक्षता पडण्यापूर्वीच पंढरपूर तालुक्यात रोखला बालविवाह !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !