BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ डिसें, २०२१

पंढरीत तेरा वर्षाच्या मुलीच्या लग्नाचा घाट, पण पोलीस धडकले आणि --




पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात एकाच दिवशी दोन बालविवाह पोलिसांनी रोखले असून अवघ्या तेरा आणि पंधरा वर्षे वयाच्या मुलींचा विवाह करण्याचा घाट त्यांच्याच आईवडिलांनी घातल्याचे समोर आले आहे.

बालविवाह कायदा अमलात असून अशा प्रकारे विवाह करणे बेकायदा असल्याची माहिती असूनही ग्रामीण भागात चोरून असे विवाह करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा विवाहाचे दूरगामी परिणाम खूपच भयानक होत असतात परंतु आईवडील वर्तमान पाहतात आणि आपल्या हाताने आपल्या मुलींचे आयुष्य बरबाद करीत असतात, पोलीस आणि बालकल्याण समितीची सदैव नजर अशा विवाहाकडे असते परंतु तरीही गुप्तता बाळगत ग्रामीण भागातून बालविवाह करण्याचा घाट घातला जातो आणि बहुतेक वेळी अक्षता पडताच किंवा काही वेळा अक्षता पडण्यापूर्वीच पोलीस पोहोचतात आणि मग नवेच प्रकरण सुरु होते. 

पंढरपूर तालुक्यात पोलिसांनी आत्तापर्यंत अनेक बालविवाह रोखले असून आणि त्याची माहिती असूनदेखील बाल विवाह करण्याचा प्रयत्न केला जातो. काल एकाच दिवशी पंढरपूर तालुक्यातील असे दोन बालविवाह पोलिसांनी अक्षता पडण्यापूर्वीच रोखले आणि नवरी म्हणून उभे करण्यात येणाऱ्या मुलींचे वय पाहून पोलीसही चक्रावले. या दोन बाल विवाहातील एका मुलीचे वय केवळ १३ वर्षांचे तर दुसऱ्या विवाहातील नवरीचे वय अवघे १५ वर्षांचे असल्याचे समोर आले. विवाह ही संकल्पना समजण्याच्या वयाच्या आताच त्यांच्या आई वडिलांनी त्यांना बोहल्यावर चढविण्याची तयारी सुरु केली होती परंतु पोलिसांना याची आधीच माहिती प्राप्त झाल्याने अक्षता पडण्यापूर्वीच हे दोन्ही विवाह रोखले गेले.

पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील म्हस्के वस्ती येथे एक बालविवाह होणार असल्याची माहिती आधीच मिळाली होती. अकलूज येथील १५ वर्षे वयाच्या मुलीचा बाल विवाह सोलापूर येथील एका युवकाशी तिसंगी येथे केला जाणार असल्याची खबर पोलिसांना आधीच होती. त्यामुळे पोलिसांनी एका पथकाची स्थापना करून सदर बालविवाह होण्यापूर्वीच पोलिसांनी रोखला आहे. महिला व बालकल्याण समितीचाही या कारवाईत सहभाग होता. प्रत्यक्ष विवाह होण्यापूर्वीच पोलीस आणि महिला बाल कल्याण विभागाचे पथक तिसंगी येथे पोहोचले आणि त्यांनी होणारा विवाह रोखला.  अल्पवयीन नवरी आणि तिच्या आई वडिलांना पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना बालविवाह कायद्याबाबत माहिती देण्यात आली तसेच त्यांचे समुपदेशन केले गेले. असा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे देखील त्यांना समजावून सांगण्यात आले. 

पंढरपूर तालुक्यातील अजोती येथील एका युवकाशी अवघ्या १३ वर्षे वयाच्या मुलीचा विवाह होणार असल्याची माहितीही पोलिसांना आधीच प्राप्त झाली होती. माढा तालुक्यातील कण्हेरगाव येथील ही अल्पवयीन मुलगी होती.  पोलिसांना गोपनीय खबर मिळाल्यामुळे पोलीस पथक सतर्क होते. अक्षता पडण्यापूर्वीच पोलिसांनी धाव घेतली आणि मुला मुलीच्या वयाची खातरजमा करून घेतली. लग्नाचा घाट घातलेल्या मुलीचे वय अवघे १३ वर्षाचे असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी हा विवाह रोखला. या दोन्ही विवाहात पोलिसांनी बालविवाह कायद्याची माहिती देत असा विवाह हा गुन्हा ठरतो याची माहिती देत अशा विवाहापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.  


हे देखील वाचा
:>>  व्वा रे मास्तर, दिवसा शाळा आणि रात्री चोरी !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !