BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ डिसें, २०२१

ओमायक्रॉन ! पुन्हा निर्बंध लागू करण्याचे केंद्राचे आदेश !



नवी दिल्ली : ओमायक्रॉन विषाणूच्या आक्रमणामुळे पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू होण्याचे संकेत स्पष्ट झाले असून राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. 

जवळपास गेल्या दोन वर्षांपासून देश आणि महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधात गुदमरून गेला आहे. आता कुठे मोकळा श्वास घ्यायला मिळू लागला असतानाच ओमायक्रॉन या विषाणूने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली असून महाराष्ट्रात या विषाणूचे रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेबाबत तज्ञ मंडळीत बरीच चर्चा झाली होती. दुसऱ्या लाटेने प्रचंड विनाश केल्याने तिसऱ्या लाटेची कल्पनाही भयभीत करीत होती. अशातच कोरोनाने परतीचा प्रवास सुरु केला आणि जनतेने सुटकेचा निश्वास टाकला, एवढ्यात ओमायक्रॉन विषाणूने शिरकाव केला आणि पुन्हा एकदा लोकांना बंदिस्त व्हावे लागेल असे संकेत स्पष्ट झाले आहेत. 

महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही भाष्य केले होते, सद्यातरी राज्यात अधिक कडक निर्बंधाची आवश्यकता नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते पण मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्बंधाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असेही सांगितले होते. दरम्यान आता केंद्र सरकारनेच राज्यांना कठोर निर्बंधाबाबत सूचना दिल्या आहेत त्यामुळे त्याप्रमाणे राज्यांना अंमलबजावणी करावी लागणार आहे . ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी बारीक लक्ष ठेवावे आणि  जेथे रुग्णदर वाढतोय तेथे कडक निर्बंध लागू केले जावेत अशा सूचनाच केंद्राने राज्यांना दिल्या आहेत. 

  ज्या जिल्ह्यात दहा टक्क्यांपेक्षा अधिक संसर्ग दर आहे किंवा ज्या भागात साठ टक्के बेड हे कोरोना रुग्णांनी व्यापले आहेत अशा जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात यावी, लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालावी तसेच राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी घालण्यात यावी असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. विवाह सोहळे आणि अंत्यसंस्कार यासाठीही लोकांच्या उपस्थितीचे मर्यादा घालण्यात यावी अशा सूचना असून केंद्र शासनाने दिलेल्या चौकटीतच या उपाय योजना करण्यात याव्यात असे केंद्र शासनाचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या पत्रात नमूद केलेले आहे. 

देशात केरळ, मिझोराम, सिक्कीम या तीन राज्यातील आठ जिल्ह्यात कोरोना संसर्ग दर गेल्या दोन सप्ताहात १० टक्क्यांपेक्षा अधिक दिसून आलेला आहे. अरुणाचल, पाँडिचेरी, नागालँड, मणिपूर, पश्चिम बंगाल या राज्यातील संसर्ग दर वाढलेला आहे. काही जिल्ह्यात हा संसर्ग दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे तर काही जिल्ह्यात तो दहा टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे त्यामुळे याकडे बारकारीने लक्ष ठेवले जावे अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत. महाराष्ट्रात नव्या विषाणूचे रुग्ण आढळून येऊ लागले असून निर्बंधांचा फास पुन्हा हळूहळू आवळत जाणार असल्याचे दिसत आहे. 

कोरोनाच्या दोन लाटांनी, विशेषतः दुसऱ्या लाटेने प्रचंड नुकसान केले असून माणसांचं जगणं कठीण केलं आहे, जवळची आणि कर्ती माणसं हिरावून नेली आहेत तर तरुणांचे बळी या कोरोनाने घेतले आहेत. दुनियेची आणि जीवनाची फिरणारी चाकं या कोरोनानं जागीच ठप्प केली आहेत. या सगळ्यातून सावरायला मोठा काळ लागणार आहे त्यातच ओमायक्रॉनने पुन्हा घुसखोरी केली असून आता अधिक सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णदरात वाढ झाल्यास पुन्हा कडक निर्बंध, संचारबंदी, लॉकडाऊन अशा वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आता अधिक गडद होताना दिसत आहे. 


 
       


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !