BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ डिसें, २०२१

भीषण अपघात : बस आणि ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक होऊन दोन ठार बारा जखमी !

 


बार्शी : खाजगी बस आणि ऊसाच्या ट्रॅक्टरची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत तर तब्बल बारा जण जखमी झाले आहेत. बार्शी - कुर्डुवाडी रस्त्यावर हा अपघात झाला. 


साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरु झाले की बेफिकीर ट्रॅक्टर चालक अनेकांचे बळी घेत सुटलेले असतात हे काही आता नवे राहिलेले नाही. अशाच ऊसाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर आणि खाजगी बसची धडक होऊन पुन्हा एकदा मोठा अपघात घडला आहे. बार्शी - कुर्डुवाडी रस्त्यावर बर्षीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आज ही घटना घडली आहे. पुण्यावरून लातूरकडे खाजगी प्रवासी बस चालली होती आणि ऊंस भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन ट्रॅक्टर विठ्ठल शुगर कार्पोरेशनकडे निघालेला होता. ही दोन्ही वाहने बार्शी कुर्डुवाडी रस्त्यावरील नांदणी गावाजवळ आली असता समोरासमोर जोराची धडक झाली. ही धडक एवढ्या जोराची होती की खाजगी बसचा चालक सिद्धार्थ अनिल शिंदे (वय २७, रा, वसवडी, जि . लातूर)  आणि त्याच्या शेजारी बसलेले मनोज शिवाजी विद्याधर ( रा. बोधनगर, लातूर) हे दोघे जागीच ठार झाले. ट्रॅक्टर चालक अनिल कोंढाऱे हा देखील या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 


या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून रस्त्यावर सगळीकडे ऊस विखुरलेला होता. ट्रॅक्टरचे तर अक्षरश: तुकडे तुकडे झाले असून बसच्या समोरच्या भागाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. बस आणि ट्रॅक्टर यांची अवस्था पाहूनच अपघाताच्या भीषणतेची कल्पना येते. या अपघाताबाबत बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात बसमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य बारा जण जबर जखमी झाले आहेत. 


ट्रॅक्टरचालक कोंढारे यांच्यासह वसंत तुकाराम पाडोळे (वय ६५  ), रहमतअली सादिकअली सय्यद (वय २९ ), विठ्ठल नामदेव पांचाळ (वय ९१), नेहा विजय सावळे (वय ५२), पार्वती बाबुराव बचुटे (वय ४९), मनीषा बाळासाहेब नलावडे (वय २७), आश्विनी राहुल कदम (वय २६), पूजा ज्ञानेश्वर बारोले (वय ३८),  कालिदास निरू चव्हाण (वय २६) हे सर्व लातूर येथे राहणारे तर विजया किसन पांचाळ (वय ४७, पुणे), हेमचंद्र दौलत मोरे (वय ४०, बारामती), दत्त रवन कांबळे (वय २८, बाभळगाव, कळंब) हे सर्व या अपघातात जखमी झाले आहेत. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !