BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० डिसें, २०२१

साठ वर्षाच्या वृद्धास दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा !

 



माळशिरस : अल्पवयीन बालिकेवर वारंवार अत्याचार करणाऱ्या एका साठ वर्षाच्या वृद्धास माळशिरस न्यायालयाने दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. नराधमाने केलेला हा प्रकार उघडकीस आला होता तेंव्हा माळशिरस तालुक्यात प्रचंड खळबळ उडालेली होती. 


पिडीत बालिकेचे आई आणि वडील दोघेही कामावर जात होते आणि जाताना आप्पा बापू नामदास या नराधमावर विश्वास ठेऊन त्यालाच घरी असलेल्या अल्पवयीन मुलीवर लक्ष ठेवायला सांगत होते. जिथं विश्वास ठेवतो तेथेच विश्वासघात होतो याचा अनुभव जवळपास सर्वांनाच असतो. असाच प्रकार येथेही घडला. पिडीत मुलीचे आई वडील दिवसभर शेतात काम करीत असायचे  आणि हा नराधम घरीच असायचा. या नराधमावर विश्वास ठेऊन आपल्या चौदा वर्षाच्या मुलीवर लक्ष ठेवायला त्यालाच सांगून ते कामावर जायचे पण त्याची वाईट नजर या पिडीतेवर पडली. पिडीतेच्या आई वडिलांनी टाकलेल्या या विश्वासाचा गैरफायदा उठवत कुठलेतरी निमित्त करीत नामदास  या अल्पवयीन मुलीला घरात बोलावून घ्यायचा. विश्वासाने ही मुलगीही घरात जायची आणि त्याने सांगितलेले काम करायची. एके दिवशी मात्र या नराधमाने या मुलीच्या तोंडात बोळा कोंबून चाकूचा धाक दाखवला आणि तिच्यावर अत्याचार केला. कुणाला काही सांगितले तर तुझ्यासकट तुझ्या आई वडिलांना मारून टाकीन अशी धमकीही या अधम प्रवृत्तीच्या आप्पा नामदास याने दिली. या धमकीला घाबरून अल्पवयीन मुलगी गप्प राहिली. 


सत्य कितीही दाबून ठेवले तरी ते दाबले जात नाही, कधी ना कधी ते स्वतःहोऊन बाहेर येत असते. या घटनेतही तसेच झाले. काही दिवसांनी मुलीच्या पोटात वेदना होत असल्याचे दिसले त्यामुळे आई वडिलांनी तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ही अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले.  डॉक्टरांनी हे  सांगितल्यानंतर आई वडिलांना जबर धक्का बसला. आई वडिलांनी विश्वासात घेऊन या मुलीकडे चौकशी केली तेंव्हा पिडीत मुलीने आपल्यावर घडलेला अत्याचाराचा प्रसंग आई वडिलांना सांगितला आणि त्यानंतर आई वडील पोलिसात गेले. अकलूज पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने २ जून २०१८ रोजी आप्पा बापू नामदास (बाभूळगाव, ता. माळशिरस) याच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.     


अकलूज पोलिसांनी पिडीत मुलीची तपासणी करण्यासाठी अकलूज येथील शासकीय रुग्णालयात पाठविले असता ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर गर्भपात करण्यात आला आणि डीएनए तपासणीसाठी आरोपी आणि पीडिता यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले होते. या तपासणीत आरोपी याचाच हा गर्भ असल्याचा अहवाल आला होता. त्यानुसार अकलूज पोलिसांनी माळशिरस न्यायालयात आरोपी आप्पा नामदास याच्याविरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी होऊन न्यायालयाने साठ वर्षे वयाच्या आप्पा नामदास याला दहा वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले असून पिडीत मुलीची साक्ष महत्वाची ठरली. सदर नराधमास शिक्षा झाल्याने माळशिरस तालुक्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.   

हे देखील वाचा : >>> पंढरपूर येथून परत निघालेल्या भाविकांची धावती कार पेटली !




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !