BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ डिसें, २०२१

सावधान ...विषारी साप घेताहेत दुचाकीचा आश्रय !

 

सोलापुरातील जुनी पोलीस लाईन येथे जाळीत अडकलेला नाग 

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून विषारी साप दुचाकीचा आसरा घेत असल्याचे दिसून आले असून आपली दुचाकी वापरण्यापूर्वी बारकाईने तपासणी करणे आता अत्यावश्यक बनले आहे .

थंडीच्या दिवसात साप घराचा आश्रय घेत असल्याचे अनेकदा दिसते पण गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडल्या होटगी रोड परिसरात आणखी एक अशीच घटना घडली आहे. सप्तगिरी सोसायटीतील बाबुलाल बिदादा यांच्या घरासमोर त्यांची दुचाकी लावलेली होती. घराच्या कंपाउंडच्या आतल्या बाजूला गाडी लावली असली तरी या गाडीकडे एक विषारी नाग जाताना काही जणांनी पाहिला. हा नाग थेट त्यांच्या दुचाकीत गेला. पुढच्या चाकाच्या मडगार्डमध्ये जाऊन त्याने आश्रय घातला. काही लोकांनी या नागाला गाडीकडे जाताना पहिले म्हणून हे लक्षात आले अन्यथा काहीही घडू शकले असते. 


दुचाकीच्या मडगार्डमध्ये आश्रय घेतलेल्या या नागाच्या पिल्लास बाहेर काढण्यासाठी सर्पमित्रांना पाचारण करावे लागले. सर्पमित्र आल्यानंतर अत्यंत कौशल्याने या नागाला बाहेर काढण्यात आले. नागाने दुचाकीत आश्रय घेतला असल्याचे बाहेरून आजीबात लक्षात येत नव्हते. दुचाकीकडे नाग जाताना काही लोकांनी पाहिले नसते तर दुचाकी बाहेर काढताना सर्पदंश होण्याचा मोठा धोका होता. सदर नागाच्या पिल्लास पकडून त्याला सुरक्षित स्थळी सोडण्यात आले. 


नुकतेच जुनी पोलीस लाईन येथील एका घरात, वॉशरूमच्या आत असाच एक विषारी नाग घुसला होता. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मैनुद्दीन शेख हे वॉशरूममध्ये गेले असता त्यांना हा विषारी नाग दिसला. त्यांच्या अस्तित्वाची चाहूल लागताच नाग पळून जाऊ लागला पण त्याला पळण्यासाठी मोकळी जागा नव्हती त्यामुळे वॉशरूमच्या जाळीतून निसटण्याचा प्रयत्न केला आणि तो जळीतच अडकला. या नागाला पुढे जाता येईना आणि मागेही येता येईना. शेख यांनी सर्पमित्रास बोलावून या नागाची आणि स्वतःचीही सुटका केली. रात्रीच्या वेळेस शेख यांच्या लक्षात आले नसते तर सर्पदंश होण्याचा मोठा धोका समोर होता. 


गेल्या महिन्यातच सोलापूर येथेच कुमठा नाका परिसरात न्यायाधीश वसाहतीत एका न्यायाधीशांच्या दुचाकीत एका सापाने आश्रय घेतला होता आणि अनेकांना घाम फोडला होता. न्यायाधीश रेणुका गायकवाड यांच्या बंगल्यावर पांडुरंग गोडसे हे गार्ड म्हणून कर्तव्यावर होते. सायंकाळच्या सुमारास एक साप दाराजवळच लावलेल्या स्कुटीच्या दिशेने चालला असल्याचे दिसले. त्यांनी पुढे जाऊन पहिले पण तोपर्यंत हा साप सरळ स्कुटीच्या आत घुसला आणि तो नेमके कोठे गेलाय हे समजू शकले नाही. गोडसे यांनी हा प्रकार न्यायाधीश गायकवाड याना सांगितला. न्यायाधीश गायकवाड आणि स्कुटीची पहाणी केली पण साप काही दिसला नाही. गोडसे यांनी तर साप स्कुटीच्या आत शिरताना पहिले पण तपासणी करूनही साप दिसत नव्हता. अत्यंत आतल्या बाजूला जाऊन हा साप लपून बसलेला होता. 


सर्पमित्राला पाचारण करण्याशिवाय गत्यंतर नव्हते त्यामुळे सर्पमित्रांना बोलाविण्यात आले. त्यांनाही हा लपलेला साप दिसत नव्हता. अखेर एका मेकॅनिकला बोलवावे लागले आणि त्याच्याकडून स्कुटी खोलून घ्यावी लागली. त्यानंतर मात्र लपलेल्या सापाचे दर्शन झाले आणि हा साप डिक्कीच्या खालच्या बाजूच्या अडचणीच्या जागी लपून बसल्याचे दिसले. तोपर्यंत जमलेल्या अनेकांची पाचावर धारण बसली होती. सदर साप हा तस्कर जातीचा असून बिनविषारी असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. सदर साप बाटलीत घालून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आला. 


नागरिकांनी मात्र अशा घटनापासून शिकण्याची गरज आहे. प्रत्येकाच्या गाड्या रात्रभर दारात लावलेल्या असतात त्यामुळे सकाळी गाडी वापरण्यापूर्वी निरीक्षण करण्याची गरज आहे. सर्पमित्रांनीही याबाबत आवाहन केले असून सद्य हिवाळ्याच्या दिवसांमुळे साप थंडीपासून बचाव करण्यासाठी गाडीचा आश्रय घेतात त्यामुळे सतर्क असणे गरजेचे आहे, सकाळी गाडीचा वापर करण्यापूर्वी गाडी सुरु करून रेस केल्यास व्हायब्रेशनमुळे साप बाहेर पडू शकतो त्यामुळे नागरिकांनी सतर्क असावे असे आवाहन करण्यात आले आहे. 


सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून अशा काही घटना घडलेल्या असल्याने नागरिकांनी सदैव दक्ष राहणे आवश्यक बनले आहे. रात्रभर दारात लावलेल्या दुचाकीत अथवा चार चाकी वाहनातही विषारी साप आश्रय घेऊ शकतो त्यामुळे सकाळी वाहन वापराआधी वाहनाचे बारकाईने निरीक्षण करण्याची गरज आहे अन्यथा कुठल्याही वेळी मोठा धोका होऊ शकतो. काही वेळ वाहन उभे असल्यास पुन्हा वापर करतानाच ही काळजी घेणे किती आवश्यक आहे हेच सोलापूर येथील काही घटनांनी दाखवून दिले आहे.        



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !